पाटस येथे भरवस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास


पाटस येथे भरवस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे वाबळे वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री धुमाकूळ घालत दोन घरे फोडून सोने व रोख रक्कम असा एक लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान कुत्र्यांच्या ओरडण्याने नागरिक जागे झाल्याने चोरांचा पुढचा डाव फसला. ग्रामस्थ व पोलिस यांनी चोरट्यांचा शोध घेतला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.

     रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रिमझिम पावसात अज्ञात चोरटे चोरी करून पसार झाले आहेत. वाबळे वस्ती येथील अशोक तुकाराम धोंडे (वय 44 रा. वाबळे वस्ती) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन कपाटाची तोडफोड करून 90 हजार रुपये किमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे गंठण, वीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा अर्धा तोळे वजनाचा वेल असा एकूण एक लाख 21 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर छगन प्रभाकर लवाण यांच्या घरात पत्र्याच्या पेटी ठेवलेले एक तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व अर्धा तोळे वजनाचे सोन्याची कर्णफुले असा एकूण 60 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

      याबाबत दोन्ही फिर्यादी यांनी पाटस पोलीस चौकी येथे फिर्याद दाखल केल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पाटस परिसरात चोरटे आल्याची खबर मिळताच यवत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव, दत्तात्रय टकले आदींनी घटनास्थळी धाव घेत घरफोडी झालेल्या घरांची पाहणी केली. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News