महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचा ९५ वर्धापनदिन उत्साहात


महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचा ९५ वर्धापनदिन उत्साहात

प्रथमेश आबनावे यांची खजिनदारपदी, तर पुष्कर आबनावे यांची सहसचिवपदी निवड

पुणे : शताब्दीकडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या प्रगतीत डॉ. विकास आबनावे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या या कार्याचा वारसा आबनावे परिवार पुढे नेत आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी माझे नेहमीच योगदान राहील. बहुजनांची शिक्षणसंस्था असलेल्या संस्थेची ओळख महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार आहोत, असे मत महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचा ९५वा वर्धापनदिन व कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते. टिळक रस्त्यावरील संस्थेच्या अशोक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा पी. डी. आबनावे, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव प्रकाश आबनावे व पुष्कर आबनावे, संचालक दिलीप आबनावे, शिरीष आबनावे, राजेश आबनावे, गौरव आबनावे, प्रज्योत आबनावे आदी उपस्थित होते.


संस्थेच्या खजिनदारपदी प्रथमेश आबनावे, तर सहसचिवपदी पुष्कर आबनावे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालय कोळविहिरेच्या मुख्याध्यापिका विनिता कुलुंगे, कोंढवा येथील कै. जडावबाई दुगड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनीलदत्त भालके, टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका छाया जगताप, संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण चव्हाण यांचा सेवानिवृत्तीबद्दल सेवा गौरव सन्मान करण्यात आला. दहिहंडी निमित्त पुस्तक हंडी फोडण्यात आली.


सुमन घोलप म्हणाल्या, संस्थेचा कारभार पाहताना नेहमी विश्वस्ताची भावना मनात असावी. डॉ. विकास यांच्यानंतर प्रसाद आबनावे नव्या पिढीतील शिलेदारांना घेऊन त्याच जोमाने वाटचाल करीत आहेत. संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वाना बरोबर घेऊन शंभरी मोठ्या उत्साहात साजरी व्हायला हवी. त्यासाठी आपण प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.


प्रसाद आबनावे म्हणाले, प्रेम, आपुलकी, परस्पर सहकार्य आणि सामंजस्याची भावनेतूनच चांगले कार्य उभारता येते, ही माझे बंधू डॉ. विकास आबनावे यांची शिकवण घेऊन कार्य करत आहे. संस्थेच्या कार्यात युवा पिढी सक्रिय आहे. आपल्या सर्वांच्या साथीने संस्थेचा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणात होईल. सर्वानी प्रामाणिकपणे व सचोटीने काम करावे. वाणिज्य, विधी महाविद्यालय, वसतिगृह आदी गोष्टी उभारण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पी. डी. आबनावे यांनीही मार्गदर्शन केले. विभा आबनावे यांनी प्रास्ताविक केले. कल्याणी साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. रुपाली राऊत यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News