सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करणे अत्यावश्यक; नाहीतर होऊ शकेल हे नुकसान...!


सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करणे अत्यावश्यक; नाहीतर होऊ शकेल हे नुकसान...!

केडगाव प्रतिनिधी, नवनाथ खोपडे

पुणे : सन २०२१-२०२२ या महसुली वर्षांपासून ७/१२ वर पिकाची नोंदणी फक्त मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अँपच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अँप घेऊन प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या अँप मध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरून पिकाचा फोटो काढून भरावयाची आहेत. यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाहीत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहे.

      यासंबंधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, १) एका रजिस्टर मोबाईल मध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येईल. २) तुमच्या मोबाईलवर आलेला ४ अंकी OTP हा तुमचा कायमस्वरूपी पासवर्ड राहील.  त्यामुळे परत तुम्हाला पीक नोंदणी करताना हा पासवर्ड आवश्यक राहील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. ३) ई पीक पाहणी अँप मध्ये पीक नोंदणी ही मर्यादित वेळेतच म्हणजे १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीतच करायची आहेत. या कालावधी नंतर पीक पाहणी नोंद होणार नाही. कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई पीक पाहणी सुरू होणार आहे. त्यामुळे कालावधीतच आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी करून घ्यावी. ४) सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र - अ हा प्रकार असेल आणि आपण ते क्षेत्र जमीन नांगरून किंवा सपाटीकरण करून लागवडीसाठी खाली आणलं असल्यास ते क्षेत्र लागवड योग्य पड क्षेत्रात नोंदणी केल्यास, त्या क्षेत्रावर देखील बँकेकडून पीक कर्ज मिळणार आहे. त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मुळे झालेली नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या क्षेत्रासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येईल. त्या क्षेत्राचा देखील पीक विमा अर्ज भरताना समावेश करता येणार आहे. ५) एकदा पीक पाहणी नोंद केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे आपल्या पिकाची नोंद अचूकपणे करावी.

     पीक पाहणी नोंद न केल्याने आपले पुढीलप्रमाणे नुकसान होऊ शकते. १) आपले शेत पडीक दाखविले जाईल किंवा पेरणी झालीच नाही असे दाखवले जाईल. २) पुढील हंगाम करिता कोणत्याही बँकांकडून पीक कर्ज घेताना अडचणी निर्माण होईल. ३) प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. ४) जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर झाली तर आपण आपली पीक नोंदणी न केल्याने शासनाद्वारे मिळणारी मदत आपल्याला मिळणार नाही. ५) जर तुमच्या शेतातील पिकांचे जंगली जनावरांमार्फत नुकसान झाले तर आपण पीक नोंदणी न केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही.

     अश्या प्रकारे आपण पीक पाहणी नोंदणी न केल्याने वरील प्रकारचे नुकसान होईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी अँप द्वारे आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. ई पीक पाहणी अँप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek. ई पीक पाहणी अँप कसे चालवावे याची माहिती देखील यु ट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News