कुल-थोरात जनतेची निव्वळ दिशाभूल करत आहेत. भीमा-पाटस कारखान्याची ईडी चौकशी व्हावी यासाठी तक्रार दाखल करणार : नामदेव ताकवणे


कुल-थोरात जनतेची निव्वळ दिशाभूल करत आहेत. भीमा-पाटस कारखान्याची ईडी चौकशी व्हावी यासाठी तक्रार दाखल करणार : नामदेव ताकवणे

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

पाटस : एकेकाळी दौंड तालुक्याची शान असणारा भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आज बंद अवस्थेत आहे. यावरून कारखान्याच्या आजी-माजी चेअरमन यांच्यात गेल्या काही दिवसात कलगीतुरा सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पण अशात सर्वसामान्य शेतकरी व सभासदांकडे दुर्लक्ष होऊन कारखाना मात्र पुन्हा सुरु करण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे कारखाना का बंद पडला? यामागचे खरे कारण जनतेसमोर यायलाच पाहिजे याकरिता सुरुवातीपासून चौकशी व्हावी म्हणून ईडी, सर्वोच्च न्यायालय, साखर व सहकार आयुक्त तसेच जिथे जिथे तक्रार दाखल करता येईल तिथे करणार असल्याचे नामदेव ताकवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

      दौंड येथे शुक्रवार दि. 3 रोजी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ताकवणे यांनी कुल-थोरात या भीमा-पाटस कारखान्याच्या दोन्ही आजी-माजी चेअरमन असलेल्या आमदारांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. दोघेही कारखाना जप्तीचे नाटक करून तमाम सभासद व शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. दरवेळी एकमेकांची चौकशीची फक्त मागणी करतात पण पुढे कोणीच का येत नाही? केवळ राजकीय फायद्यासाठी एकमेकांवर आरोप करून स्वतःच्या खुबीने याचे भांडवल करतात. पण कारखाना सुरू व्हावा म्हणून कोणीच पुढाकार घेत नाही. हि परिस्थिती बदलायची असेल तर केवळ बातम्यांच्या आधारे चौकशी होत नसून कोणीतरी तक्रार दाखल करावी लागते. आणि हेच काम ताकवणे स्वतः करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

      यावेळी कारखान्याची सुरुवातीपासून चौकशी व्हावी या मागणीवर ठाम राहात 1992 साली कारखान्याकडे 25 कोटी शिल्लक होते व कारखाना कर्जमुक्त होता. मग 2021 मध्ये तो तोट्यात कसा गेला? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 36 कोटींचे अर्थसाहाय्य व इतर मार्गांनी आलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे? जिल्हा बँकेने कुठल्या आधारावर जप्तीची नोटीस दिली? 2014-15 पासून कारखान्याचा साठा बँकेच्या ताब्यात असतानाही का तपासला नाही? 2020 साली साठ्याला आग लागून जळूनही बँकेने का तक्रार दाखल केली नाही? 2017 ला वसुली संदर्भात बैठक घेतली आहे असे थोरातांनी त्यावेळी सांगितले होते मग 4 वर्षानंतरही कारवाई का नाही केली? बँकेने पाठविलेल्या 150 कोटी रुपयांच्या जप्तीच्या नोटिशीतले पैसे नेमके गेले कुठे? यात कुल-थोरात यांचे संगनमत तर नाही ना? तालुक्यात सर्वेक्षणानुसार 40 लाख मेट्रिक टन ऊस असताना, 550 गुऱ्हाळघरे व अजून तीन कारखाने असतानाही ते बंद नाही पडले मग हाच कारखाना बंद का पडला? कारखाना आर्थिक डबघाईला आला असेल तर तो अडचणीत कोणी आणला? अश्या अनेक संशयास्पद प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच माझे कोणाविषयी व्यक्तिगत मत नसून कारखान्याच्या बाबतीत मत आहे असेही त्यांनी सांगितले.

     भीमा-पाटस कारखान्याच्या अशा अवस्थेला जो कोणी जबाबदार असेल तो चौकशी सुरु होताच दिवाळीपर्यंत गजाआड असेल आणि कोणी दोषी नसेल तर त्याला जनता परत स्विकारेलच. त्यामुळे 49200 सभासद व त्रस्त शेतकऱ्यांसाठी कारखाना वाचला पाहिजे व तो पुन्हा सुरु व्हावा असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनीही तक्रार देण्यासाठी सोबत यावे असेही ताकवणे यांनी आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम, भीमा-पाटसचे सभासद हणमंत बोत्रे, प्रमोद मोरे व बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष गोरख फुलारी आदी पदाधिकारी समर्थनार्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News