लोकवस्ती मधील फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम कायमचे बंद होण्यासाठी रविवारी धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिकांचा प्रेमदान चौकात रास्तारोको


लोकवस्ती मधील फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम कायमचे बंद होण्यासाठी  रविवारी धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिकांचा प्रेमदान चौकात रास्तारोको

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- शहरातील धर्माधिकारी मळा येथील नागरिकांनी विरोध दर्शवूनही फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आले असताना, लोकवस्ती मधील सदरचे काम कायमचे बंद करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी रविवार दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिकांची बैठक पार पडली. यामध्ये नागरिकांनी एकमताने सदर टॉवरला विरोध दर्शवून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. झालेल्या बैठकीप्रसंगी अ‍ॅड. कारभारी गवळी, धीरज तनपुरे, अनिल बोरा, गोरक्षनाथ दांगट, ललीता गवळी, मनिषा भोसले, मधुमती दांगट, योगिता शेटे, अनिता भंडारी, मिनल गोरे, संध्या पवार, शिल्पा कुलथे आदिंसह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.मोबाईल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भाडे व आगाऊ रक्कम मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता जागा मालक टॉवर उभारत आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लोकवस्तीपासून लांब मोबाईल टॉवर उभारण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. तसेच 2020 मध्ये कोलकत्ता उच्च न्यायालयाने लोकवस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास बंदीचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे मार्च 2021 पंजाब उच्च न्यायालयाने देखील लोकवस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास बंदी घातलेली आहे. तरी महापालिका प्रशासनाचे अधिकारी आर्थिक हितासाठी लोकवस्तीमध्ये अशा टॉवरला परवानगी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेने लोकवस्ती मध्ये उभे राहत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरची दिलेली परवानगी रद्द करुन सदर काम कायमचे थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News