तंत्रज्ञान क्षेत्रात "कृत्रिम बुद्धिमत्ते" ला विशेष महत्त्व..... अच्युत गोडबोले


तंत्रज्ञान क्षेत्रात "कृत्रिम बुद्धिमत्ते" ला विशेष महत्त्व..... अच्युत गोडबोले

आकुर्डीतील पीसीसीओई मध्ये दिव्या मुनोत, नेहा ठिपसे, नविन हुगार सह १९४ विद्यार्थ्यांचा गौरव

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पिंपरी, पुणे (दि. 2 सप्टेंबर 2021 ) थोर शास्त्रज्ञ गॅलिलिओ, कोपर्निकस यांनी लावलेल्या संशोधन व शोधांवर आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास पाया रचला आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अतिशय वेगाने  वाढणार असून, या तंत्रविज्ञानास आणखी विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या  (पीसीईटी)  पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयच्या (पीसीसीओई) अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या संगणक, इ ॲण्ड टीसी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी विद्या शाखेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या नेहा ठिपसे, नविन हुगार आणि यांच्यासह गेल्या शैक्षणिक वर्षातील सर्वोत्तम विद्यार्थी हा पुरस्कार दिव्या मुनोत हिला देवून गौरविण्यात आले. यावेळी अच्युत गोडबोले, कर्नल गगन राणा ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी गोडबोले यांनी तंत्रज्ञानामध्ये "कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर" या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. जी. एन. कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. जान्हवी इनामदार, डॉ. प्रविण काळे, डॉ. अजय गायकवाड, प्रा. केतन देसले, विद्यार्थी आणि पालक आदी उपस्थित होते.

प्रारंभी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. एन. कुलकर्णी यांनी पीसीसीओईच्या प्रगतीचा आढावा घेतला.

गोडबोले म्हणाले की, १९६० मध्ये मर्यादित स्वरुपात संगणकाचा वापर सुरू झाला. पुढे १९८० च्या दशकात संगणक क्रांती झाली आणि हळूहळू त्याची व्याप्ती वाढत गेली. मोठ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय यामध्ये संगणकाचा वापर सुरू झाला. १९९० नंतरच्या दशकात इंटरनेटने तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढला. वर्ष २००० मध्ये तंत्रज्ञानाने आणखी एक नवा आविष्कार जन्माला घातला तो म्हणजे मोबाईल.

मोबाईल फोनचे पदार्पण झाले आणि आधुनिक तंत्रज्ञान संगणक - इंटरनेट - मोबाईल यामुळे सामान्यांच्या अधिकच जवळ व वापरण्यास सुसह्य होत गेले. २०११ नंतरच्या दशकामध्ये माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, महाविद्यालये, विविध प्रकारच्या सेवांमध्ये अमुलाग्र बदल झाले. जगाच्या एका कोपऱ्यातील माहिती काही क्षणातच सर्वत्र मिळू लागली. "कृत्रिम बुध्दिमत्ते" चा वापर माहिती, सेवा, अनेक प्रकारच्या अभियांत्रिकी शाखा यांची माहिती संकलन आणि त्याचा पुनर्वापर यासाठी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. बॅंका, कंपन्या, उद्योगधंदे, सरकारी योजना, सेवा सर्व सामान्यांना विना विलंब आणि त्रुटी विरहित मिळण्यासाठी मदत होते. म्हणूनच विविध तंत्रज्ञानाचा एकत्रित परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे गोडबोले म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे "रजनिकांत"

अभिनेता रजनीकांत चित्रपटात ज्या अचाट, अफाट कृती दाखवून प्रेक्षकांना अचंबित करतो. अगदी त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा एकत्रित उपयोग करून संभाव्य परिणाम फायदे-तोटे विचारात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनेक क्षेत्रांत वाढणार आहे. घरगुती उपकरणे, बॅंका, महाविद्यालये अगदी सर्वांच्या औसुक्याचा विषय हवेत उडणारी कार यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, उपयुक्तता वाढणार आहे. या तंत्रविज्ञानामुळे जुने रोजगार संपून नवीन रोजगार, स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील. त्यासाठी तरूणांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. नाही तर प्रवाहाच्या बाहेर फेकले जाल, असा इशारा डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. जी. एन. कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. शितलकुमार रवंदळेडॉ. जान्हवी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण काळे, डॉ. अजय गायकवाड, प्रा. केतन देसले आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्तविक डॉ. ए. के. गायकवाड, आभार डॉ. वृषाली भालेराव यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News