चंद्रकांतदादा पाटील यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन


चंद्रकांतदादा पाटील यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दिः २५ ऑगस्ट: “भारतीय संस्कृतीने व अध्यात्माने संपूर्ण जगावर राज्य केले आहे. त्यामुळे आजच्या काळात वसाहतवादी मानसिकतेला छेद देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच विचारधारेचा धागा पकडून कार्य सुरू केले आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने याला चळवळीचे रूप देऊन कौतुकास्पद कार्य करीत आहेत.” असे विचार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे "वसाहतवादी मानसिकता बदलणे" (Overcoming the Colonial Mindset) या विषयावर कोथरूड येथील कॅम्पसमध्ये आयोजित पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, वरिष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत जोशी, डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे ऑनलाइन उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,“ देशात १८ ते २५ वर्षावयोगटातील युवकांची संख्या अधिक असल्यामुळे परिवर्तनाची लाट येईल, पण त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य महत्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतर ही नागरिकांच्या दैनंदिन गरजापूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ कोटी पक्क्या घरांची निर्मिती, प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सोय, ८ कोटी महिलांसाठी गॅस आणि घरा घरात शौचालय या सारख्या आवश्यक गोष्टींना प्राथमिकता देण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.”

“भारतीय संस्कृती आणि परंपरेला देशात पुन्हा मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी हा विषय केंद्रात प्रखरतने मांडण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. लोकांच्या जीवनव्यवहाराचा विषय व्हावा, यासाठी राहुल कराड यांनी सुरू केलेली ही चळवळ देशात नक्कीच परिवर्तन घडवून आणेल.”

राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ ही संकल्पना शैक्षणिक उपक्रमात कशी जोडता येईल यावर कार्य सुरू आहे. ब्रिटिशांच्या विचारधारेला कुठे तरी छेद देण्याचे कार्य आधुनिक काळात होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृती व परंपरेच्या विचारधारेचे बीज पेरणे गरजेचे आहे. संस्थेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर हा विषय मांडून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील. भविष्यात हीच विचारधारा एक मोठी चळवळ होईल.”

संजय नहार म्हणाले,“घोषणा देण्यापेक्षा प्रत्यक्षात कार्य उतरविले तर त्यांचे परिणाम अधिक चांगले दिसतात. आज याच विचारधारेच्या आधारे ही शैक्षणिक संस्था विश्‍वशांतीचे कार्य करीत आहे, जे मानवकल्याणासाठी सर्वोत्तम आहे.”

लक्ष्मीकांत जोशी म्हणाले,“ वसाहतवादी मानसिकता मुक्ततेसाठी एमआयटीने सुरू केलेला उपक्रम पुढे चळवळ बनेल. प्राचीन काळातील विज्ञानवादी भारतीय परंपरा, सुधारणावादी तत्वविचार आणि विश्‍वशांतीच्या मूल्यांचे प्रतिपादन करणारी ही विचारसरणी आहे.”

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ स्वातंत्र्याच्या संकल्पाला नवा आयाम देण्यासाठी ही चळवळ आहे. वसाहतवाद म्हणजे वंशवाद आणि हिंसा असा अर्थ होतो. संस्कृती, भाषिक पातळीवरही याचे परिवर्तन होणे गरजेचे आहे. वैचारिक आणि मानसिक मुक्ततेचा नवा परिवर्तनवादाचा हा प्रवास आहे”

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात हा विचार मांडणे हे सर्वात महत्वाचे आहे. आज पुन्हा भारतीय संस्कृती, परंपरा आणि येथील रूढींचा वापर आचरणात कसे आणता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यासाठी नव्या पिढीला ही विचारधारा दयावयाची आहे.” प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलश्री हरिदास यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News