बदली होऊनही ठाणे सुटेना, बदली कर्मचाऱ्याला वरदहस्त कुणाचा ? भिगवण पोलीस ठाण्यातील प्रकार


बदली होऊनही ठाणे सुटेना, बदली कर्मचाऱ्याला वरदहस्त कुणाचा ?  भिगवण पोलीस ठाण्यातील प्रकार

भिगवन प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यातील बदली झालेल्या कर्मचाऱ्यानी अद्याप पोलीस ठाणे सोडले नसल्याने या पोलीस कर्मचाऱ्याला वरदहस्त कुणाचा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

    पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचा आदेश क्र. पोशि/सपोफौ/९६६७/२०२१ दिनांक १० जून २०२१ मध्ये प्रशासकीय सार्वत्रिक बदल्या जाहीर झाल्या होत्या. यामध्ये जुन्नर येथील दोन, भिगवण येथील एक, शिक्रापूर येथील एक व पौड येथील एक अश्या एकूण पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश प्रसिद्ध झाला होता. संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यामुक्त करून १२ जून पर्यंत पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच संबंधित बदली केलेल्या कर्मचाऱ्यांनी इतरत्र बदलीसाठी विनंती अर्ज करू नये. बदली झालेल्या ठिकाणी मुदतीत हजर न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. जून महिन्याचे पगार बदली झालेल्या ठिकाणी काढले जाणार होते असे आदेशात नमूद करण्यात आले होते. 

     इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची बदली झाली होती. पण पोलीस कर्मचारी भिगवण पोलीस ठाणे सोडण्यास तयार नाही. संबंधित पोलीस कर्मचारी यांनी राजकीय आश्रय घेत वरिष्ठांवर दबाव टाकून बदली रद्द केल्याची चर्चा भिगवण परिसरात जोमात चालू आहे. २८ व २९ जुलै रोजी पोलीस अधीक्षक यांनी बदलीबाबत नव्याने चार आदेश जाहीर केले आहेत. पण अगोदरच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नसताना नवीन आदेश कशाला ? तसेच बदलीबाबत लेखी आदेश असताना पोलीस कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास टाळाटाळ का केली जात आहे ? याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. 

   संबंधित पोलीस कर्मचाऱ्यानी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्याप भिगवण पोलीस ठाणे सोडले नाही. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा बदली संदर्भातील अहवाल वरिष्ठांना का सादर केला नाही ? पोलीस अधीक्षक यांचा बदलीबाबतचा लेखी आदेश म्हणजे फक्त कागद का ? या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प का बसले आहेत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    वरिष्ठांनी राजकीय दबावाला बळी न पडता संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला भिगवण पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News