भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार-चंद्रकांत पाटील


भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार-चंद्रकांत पाटील

पुणे:     भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी असून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर प्रखर निदर्शने करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केली.

          ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोणतेही अटक वॉरंट नसताना केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे. जनादेशाच्या विरोधात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने सत्तेचा दुरूपयोग करून सूडबुद्धीने मा. राणे यांना अटक केली आहे. भाजपा याचा निषेध करते.


          ते म्हणाले की, मा. नारायण राणे हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. मा. राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे घाबरून आघाडी सरकारने कारवाई केली आहे. त्यासाठी बळाचा वापर करा, असे पालकमंत्री सांगत असल्याचेही वाहिन्यांवरून स्पष्ट झाले आहे.

          त्यांनी सांगितले की, मा. नारायण राणे यांच्या सुटकेसाठी भाजपा सर्व ते प्रयत्न करेल. या बाबतीत न्यायालय योग्य तो आदेश देईल, असा विश्वास आहे. खासदार म्हणून त्यांना असलेल्या विशेषाधिकारांचा भंग झाल्यामुळे संसदेत संबंधितांकडेही भाजपाच्या खासदारांकडून तक्रार करण्यात येईल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News