पारनेर तहसिलदार देवरे यांचे निलंबन करुन सक्तीने सेवानिवृत्ती द्यावी


पारनेर तहसिलदार देवरे यांचे निलंबन करुन सक्तीने सेवानिवृत्ती द्यावी

पीपल्स हेल्पलाईनचे मुख्यमंत्री व महसुलमंत्री यांना निवेदन

देवरे यांनी अनागोंदी आणि भ्रष्टाचाराचा नवा पॅटर्न लागू केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- पारनेर तालुक्यात तहसिलदार ज्योती देवरे यांनी महसूल खात्यात अनागोंदी माजवली असल्याचा आरोप करुन, त्यांचे निलंबन व्हावे व त्यांना तात्काळ सक्तीने सेवानिवृत्ती देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पाठविले असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 पारनेर तालुका हा स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचा तालुका आहे. याच तालुक्यातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  हे देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचा लढा देत आहे. या तालुक्यांमध्ये तहसिलदार म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती देवरे यांनी महसूल विक्रीचा उच्चांक गाठून वाळू माफियांना हाताशी धरुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सरकारी कामात अडथळा आनण्याच्या नावाखाली अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध त्यांनी दहशत निर्माण केली. तर कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस बळाचा वापर केला. पारनेर तालुक्यांमध्ये बेकायदेशीर वाळूचा उपसा रात्रंदिवस चालू ठेवून लॅण्ड माफिया व वाळू तस्करांच्या टोळ्या कार्यरत केल्या. या बेकायदेशीर कामातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले. आदिवासींच्या जमिनी बाबत असणार्‍या प्रकरणांमध्ये व्यापक स्वरूपात महसूल न्याय विक्री केली. खडकवाडी येथील 50 वर्षापूर्वी मयत झालेल्या आदिवासी विरुद्ध खटला चालविला. विशेष म्हणजे मेलेल्या माणसाची भलत्याच माणसाला खोटी नोटीस बजावून केस चालविण्यात आली. मयताचे वारसा आपले म्हणणे मांडण्यासाठी गेले असता तहसीलदार देवरे यांनी त्यांना हाकलून लावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

अशा प्रकरणाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात महसूल न्याय विक्रीचा त्यांनी उच्चांक गाठला आहे. कोरोनाच्या सोळा महिन्यांच्या काळात लोक घरांमध्ये असताना पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु होता. या वाळू तस्करांना अभय देऊन त्यांनी कोट्यावधीची माया जमवली. देवरे यांनी अंदाधुंदी आणि भ्रष्टाचाराचा नवा पॅटर्न लागू केला. भ्रष्टाचाराचा आरोप झाकण्यासाठी त्यांनी कांगोवा केला असून, महिला अधिकारी म्हणून त्या सहानुभूती मिळवत आहेत. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास विघातक प्रवृत्ती समाजात पोसली जाईल. अशा तहसीलदारांना शासनाच्या सेवेत ठेवणे धोक्याचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महसूल विक्री व महसूल अनागोंदीचा नवा पॅटर्न थांबविण्यासाठी तहसिलदार देवरे यांचे निलंबन करुन तात्काळ त्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास महसूल न्याय विक्रीबाबत सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मागणीसाठी संघटनेचे अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News