वाहतूक कोंडीवर तोडगा ठरणारे घोरपडीतले रेल्वे उड्डाणपूलही वर्षभरात पूर्णत्वास जाणार


वाहतूक कोंडीवर तोडगा ठरणारे घोरपडीतले रेल्वे उड्डाणपूलही वर्षभरात पूर्णत्वास जाणार

पुणे:गेल्या दोन दशकांमध्ये आयटी पार्क्समुळे हिंजवडी आणि तळवडे भागासोबतच मुंढवा आणि खराडी भागातही नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या भागात एका मोठ्या पुलासह आठ नवे रस्ते, पीपीपी तत्वावर विकसिक केले जाणार आहेत. नगर रस्त्यावरचा वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी या रस्त्याला समांतर असा बंडगार्डन ते मुंढवा असा मार्गही पीपीपीअंतर्गत प्रस्तावित आहे. मुळा-मुठा नदीच्या उजव्या पात्रालगत हा मार्ग विकसित केला जाणार आहे.

पुढच्या २५ वर्षांची या भागाची वाढ आणि गरज लक्षात घेता पब्लिक-प्रायव्हेट- पार्टनरशीप अंतर्गत (पीपीपी) नवीन रस्ते, आणि रस्त्यांची पुनर्रचना करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासोबतच वाहतूक कोंडीवर तोडगा ठरणारे घोरपडीतले रेल्वे उड्डाणपूलही वर्षभरात पूर्णत्वास जातील अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.

वर्षभरात रेल्वे उड्डाणपूल प्रवासासाठी खुले

घोरपडी गावातला रस्ता अरूंद असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर रोज वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी आणि रेल्वे क्रॉसिंगची समस्या कायमची सोडवण्यासाठी इथं दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या उड्डाणपुलांमुळे घोरपडी गावातून पुणे रेल्वे स्थानक, ससून रुग्णालयासह शहरातल्या इतर भागांमध्ये प्रवास करणं सुलभ होईल. या उड्डाणपुलांचं २० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं आहे. वर्षभरात हे उड्डाणपूल प्रवाशांना प्रवासासाठी खुले होतील.

बी. टी. कवडे रस्त्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधी

अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार शहरातल्या बहुतांश रस्त्यांची पुनर्रचना टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. या अंतर्गत बी. टी. कवडे रस्त्यावरच्या तीव्र उतारावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. व्हीआयपी रस्त्याअंतर्गत बी. टी. कवडे रस्त्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधीही देण्यात आला आहे.

 पुणेआणि परिसरात शहरीकरणाची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ होत आहे. आयटी आणि स्टार्टअप  कंपन्यांमुळे पुणे आणि आसपासच्या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. त्यात खराडी , मुंढवा  आणि घोरपडी  या भागातही शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुणे महापालिकेने  नवे पायाभूत प्रकल्प हाती घेतले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News