पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज


पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

पुणे:ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरूवात झाली. पुढील आठवडाभरात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


जुलै महिन्याच्या अखेरपासून राज्यात पावसाने दडी मारली होती. अनेक भागात तर पावसाचा थेंबही पडला नसल्याने खरीपाची पिके वाळून गेली होती. अडचणीत सापडलेल्या खरीपाला गेल्या आठवड्याच्या अखेरीस काही दिवसांत झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात १६ ऑगस्टनंतर चांगला पाऊस पडला. तर पूर्व विदर्भ, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता.


गेल्या आठवड्यात १२ ते १८ ऑगस्ट या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खुपच कमी होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत अवघा २६ टक्के, पुणे जिल्ह्यात ३४ टक्के तर सातारा जिल्ह्यात अवघ्या ३८ टक्के पावसाची नोंद झाली. उलट पावसाने दमदार हजेरी लावल्याने जालना जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल २१९ टक्के अधिक पाऊस पडला. धुळे जिल्ह्यात १७८ टक्के अधिक, औरंगाबाद ११० टक्के अधिक तर परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०० टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. जळगाव, नगर, बीड, हिंगोली जिल्ह्यांतही चांगला पाऊस पडला.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (२० ते २६ ऑगस्ट) राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहणार आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि

 हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (२० ते २६ ऑगस्ट) राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहणार आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.


दुसऱ्या आठवड्यात (२७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात राज्याच्या चारही विभागामध्ये आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातही या काळात पूर्व मराठवाडा व लगतच्या पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


गेल्या दोन आठवड्यात पावसाच्या दडीने राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३६ अंशांपर्यंत पोचले होते. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने, व ढगाळ हवामानामुळे बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान पुन्हा ३० अंशांच्या खाली आले आहे. पुढील आठवड्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक, तर उर्वरीत राज्यात सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या सर्वच भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News