राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य वाचावे... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड


राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य वाचावे... - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचा श्वास आहे. त्यांचे परखड लिखाण आणि प्रबोधनपर साहित्य महाराष्ट्राला नवी दिशा देणारा आहे. प्र. ठाकरे यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रबोधनाचा महाजागर निर्माण होऊ शकतो, एवढी ताकद त्यांच्या साहित्यात आहे. मात्र ठाकरे कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचले नाही म्हणून ते चुकीच्या इतिहासकाराचे समर्थन करतात. त्यांनी वेळीच चूक दुरुस्त करून प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे... असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख संभाजी ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने करून दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य पोहोचल्यामुळे समृद्ध तरुणांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी फार मोठी मदत झाली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख आम्हाला मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यामुळे झाली, हा इतिहास आहे.


आम्ही प्रबोधनकारांच्या रक्ताचे वारस नसलो तरी विचारांचे वारसदार नक्की आहोत. कारण संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचा मूळ गाभा हे प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आहे. त्यामुळेच आम्ही परिवर्तनाची भाषा बोलतो आहोत. हीच भाषा त्यांचे रक्ताचे वारसदार विसरले ती फार मोठी खंत आहे. राज ठाकरे यांनी ही चूक तात्काळ दुरुस्त करावी अशी विनंती आहे.


ब. म. पुरंदरे हे खोटा इतिहास मांडणारे आणि चुकीच्या इतिहासाचा प्रचार करणारे तथाकथित इतिहासकार आहेत. ते जेम्स लेन समर्थक असून जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीच्या प्रकरणात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. चुकीचा इतिहासात मांडणाऱ्याचं समर्थन करणं हा शिवद्रोह आहे. मा. राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने आज राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण पुस्तक रूपात साहित्य "कुरियर" द्वारे पाठवण्यात येणार आहे. ते संपूर्ण साहित्य राज ठाकरे यांनी वाचावे व कार्यकर्त्यांनाही वाचन संस्कृती वाढवावी ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती आहे.


यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील रायकर, सोनू कुंजीर आदी उपस्थित होते.


*- संतोष शिंदे,*

प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र

जाहिरात
Search
विडिओ
Recent News