समाजाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचं मोठं योगदान- चंद्रकांत पाटील


समाजाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचं मोठं योगदान- चंद्रकांत पाटील

पुणे:समाजाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. अनेक वेळी खस्ता खाऊन, त्यांनी समाजाला उभं करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे.  विदेशात ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सन्मान केला जातो आणि भारतीय संस्कृती तर ज्येष्ठांच्या सन्मानाची परंपरा असलेली आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्यांना गरजेच्या वेळेस मदत उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आज कोथरूड मतदारसंघातील बाणेर मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी "डॉक्टर आपल्या घरी" उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बाणेर मधील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि त्याच बरोबर मोफत औषधोपचार ही दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. 

या कार्यक्रमाला अस्कॉप या पुण्यातील ११२ ज्येष्ठ नागरिक संघाच्या मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष मधुकर पवार, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, डॉक्टर आपल्या घरी उपक्रमात सहभागी डॉ. बोरुडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आजच्या गतीमान जीवनपद्धतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेकांना ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधांचा लाभ झाला. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सेवा हेच संघटन हा मंत्र दिला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तरुणांऐवजी ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहिजे. ज्यामध्ये कुटुंबातील कर्त्या व्यक्ती कामानिमित्ताने परगावी जाणार असतील, अशावेळी ज्येष्ठांच्या काळजीसाठी एखादे सेंटर सुरू करणे, किंवा विरंगुळा केंद्रासोबतच शहरा जवळच एखादे गेस्ट हाऊस उभारुन, ज्येष्ठांनाही निसर्गाचा आनंद मिळावा, यासाठीची तजवीज केली पाहिजे. अथवा अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठांच्या देखभालीची व्यवस्था आदी उपक्रम सुरू केले पाहिजेत. महानगर पालिकेच्या माध्यमातून असे उपक्रम सुरू झाल्यास उत्तम. मात्र, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी लोकभागातून असे उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर पवार म्हणाले की, फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ज्येष्ठ नागरिक क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे डॉक्टर आपल्या घरी अशा उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांना नक्की फायदा होईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप बुटाला यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभाग २७ च्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News