राज्यात पावसासाठी पोषक हवामान


राज्यात पावसासाठी पोषक हवामान

पुणे:राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत आहे. उद्या (ता.१५) कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

बिहार आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. उत्तर आंध्र प्रदेशपर्यंत किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ओडिशामध्ये चक्राकार वाऱ्यांची आणखी एक स्थिती सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे.

राज्यात १५ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, अकोला, चंद्रपूर, नागपूर येथे तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे सरकला आहे.

शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, रत्नागिरीतील खेड येथे ९४ मिलीमीटर, संगमेश्वर प्रत्येकी ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूरमधील गगणबावडा येथे ६८ मिलीमीटर, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News