पाटस येथे ताबा सुटलेल्या चारचाकीच्या धडकेत मेंढपाळ तरुणी ठार


पाटस येथे ताबा सुटलेल्या चारचाकीच्या धडकेत मेंढपाळ तरुणी ठार

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूर दिशेने भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाचे "स्टेरिंग लॉक" होऊन चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने मेंढपाळ तरुणीला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणी जागीच ठार झाल्याची घटना शनिवार (दि.१४) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली.

     पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातात मयत झालेल्या मुलीचे नाव सुमन विठ्ठल पडळकर (वय १७ रा. गिरीम, ता.दौंड, जि.पुणे) असे आहे तर अपघातग्रस्त चारचाकी वाहनातील तिघांना मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.

     पाटसमधील भागवतवाडी येथे सोलापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात गिरीम येथील धनगर समाजातील पडळकर कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून मुक्काम ठोकून आहेत. सुमनला वडील नसल्याने तिचा सांभाळ एकटी आई करत होती. तिला तीन भाऊ आहेत.

     दरम्यान, चरण्यासाठी सोडण्यात आलेला घोडा रस्त्यालगत जाईल म्हणून सुमन त्या घोडीला हाकलण्यास गेली असता ताबा सुटलेल्या शेवरोले कंपनीच्या क्रूझ गाडीने (एमएच 14 सीसी 8625) सुमनला जोरदार धडक दिली. यामध्ये डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर धडक देऊन अपघातग्रस्त वाहन पुढे सुमारे तीनशे फुटांवर जाऊन पलटी झाले. यात कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या घटनेने सुमनच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

     या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल समीर भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संभाजी सोमा पडळकर यांनी फिर्याद दिल्याने वाहन चालकाविरुद्ध पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News