अनेक पदकांपेक्षा मोठे एक स्मितहास्य ठरले. -गौरव घुले


अनेक पदकांपेक्षा मोठे एक स्मितहास्य ठरले. -गौरव  घुले

मी एक खेळाडू म्हणून आजपर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या. पॉवरलिफ्टिंग मध्ये राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना अनेक प्रकारचे अनुभव आले. चांगल्या वाईट अनुभवातून पुढे जात राहिलो.

पण म्हणतात ना एक सच्चा खेळाडू तोच असतो जो टीम प्लेयर असतो. हा गुणधर्म मला कार्यकर्ता आणि खेळाडू यांच्यामध्ये समान वाटतो. म्हणूनच मैदानावर असलेला माझ्यातील खेळाडू बाहेर एक कार्यकर्ता म्हणून वावरत असतो.

दि. 22 जूलैची रात्र आपल्या कोकणवासीयांसाठी काळरात्र ठरली. महापूराच्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन धडकल्या आणि मन अस्वस्थ झाले. 

या आपल्या बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. 

काय करावे हा विचार करत चिपळूण, महाड भागात असलेल्या परिचितांशी संपर्क साधला. 

आणि मग सुरू झाला एक प्रवास... साधारण १३०० किलो तांदूळ, ४०० किलो डाळ, २०० लि. तेल, १०० किलो पोहे, ३०० किलो साखर, मेडिकल किटस्, ५०० लोकांसाठी कपडे, १८०० पाण्याच्या बाटल्या या सर्व सामानाची जमवाजमव झाली. 

म्हणतात ना तुम्ही चांगल्या विचारांनी चालत रहा. लोक आपोआप जोडले जातात. तसेच काहीसे झाले. श्री शारदा गजानन मंडळ, महेश सोसायटी मित्र परिवार, गौरव घुले मित्र परिवार हे सर्वजण एकत्र आले आणि बघता बघता साहित्याने भरलेल्या दोन गाड्या व २० जणांची टीम चिपळूणकडे रवाना झाली. 

आपला कोकणी बांधव खचणारा नाही याचा प्रत्यय आम्हाला तिथे पोहचलो की आलाच. मदतकार्यासाठी गेलेल्या आमच्या सर्वांच्या सोबत स्थानिक सहकारी पण खंबीरपणे उभे राहिले. 

सर्व साहित्याचे योग्य नियोजन करून जिथे खरंच गरज आहे अशा एका एका ठिकाणी जाऊन आमच्या सर्व टीम मदत करू लागल्या. 

३१ जुलै आणि १ आॅगस्ट असे दोन दिवस आम्ही सर्वजण चिपळूण आणि आसपासच्या प्रत्येक गावात जाऊन मदत करण्याचा प्रयत्न करित होतो. 

कोकणवासीयांना धीर देणे आणि त्यांच्यासाठी हा खारीचा वाटा उचलू शकलो याचे समाधान नक्कीच जाणवत होते. 

प्रत्येकापर्यंत पोहोचल्यावर जेव्हा समाधानाच्या स्मितहास्याची लकेर त्यांच्या चेहर्‍यावर उमटत होती तेव्हा मला अनेक स्पर्धामध्ये जिंकून गळ्यात मेडल घेतानाचा क्षण आठवत होता.

प्रेरणा म्हणजे दुसरे काय असते? 

आपला, 

गौरव  घुले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News