विठ्ठल वाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे नदी काठावरून उड्डाणपुल ! पुणे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू


विठ्ठल वाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे नदी काठावरून उड्डाणपुल ! पुणे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

पुणे:विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे  दरम्यान नदीच्या काठाने उड्डाणपुल  करण्यासाठी महापालिका प्रशासनाने  सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सल्लागाराच्या मार्फत प्रकल्पाचा प्री फिजिबिलिटी आणि पर्यावरण अहवाल तयार केल्यानंतरच या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

सिंहगड रस्ता आणि राजाराम पुल ते शिवणे दरम्यान वाहतुक जलद गतीने व्हावी यासाठी मुठा नदीच्या दोन्ही तिरावरून रस्ता करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते.

परंतू पर्यावरणवाद्यांनी नदी प्रवाहात अडथळा होउन पूरपरिस्थिती गंभीर होण्यासोबतच पर्यावरणाचा र्‍हास होण्याची भिती व्यक्त करत राष्ट्रीय हरित लवादाकडे अर्थात एनजीटी मध्ये याचिका दाखल केली होती.

या याचिकेचा निकाल महापालिके विरोधात गेल्याने महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात  अपिल केले होते. परंतू येथेही विरोधात निकाल लागल्याने महापालिकेला काम थांबवावे लागले व रस्त्याच्या कामासाठी टाकलेला भरावही काढून टाकावा लागला. यामध्ये तब्बल २० कोटी रुपयांचा चुराडा झाला.

परंतू न्यायालयाने निकाल देताना नदी पात्रातील ब्लू लाईनमधून प्रवाहाला अडथळा न करता उन्नत मार्ग करता येईल, असाही निष्कर्ष नोंदविला आहे. न्यायालयाच्या याच निष्कर्षाचा आधार घेत महापालिकेने पुन्हा एकदा म्हात्रे पुलाकडून शिवणेकडे जाणार्‍या विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी या सुमारे ४.५ कि.मी. तसेच वारजे ते शिवणे या सुमारे १.२ कि.मी. नदी काठचा रस्ता अर्थात उड्डाणपुल करण्यासाठी प्री फिजिबिलिटी व पर्यावरण अहवाल करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच उड्डाणपुल करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

सल्लागार नेमण्यासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सुरूवात केल्याची माहिती या विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावर अगदी खडकवासल्यापर्यंतचा भाग महापालिकेमध्ये आला आहे. या संपुर्ण रस्त्यावर मागील काही वर्षात मोठ्याप्रमाणावर लोकवस्ती झाली असून लोकसंख्या चार लाखांच्यापुढे गेली आहे.

परंतू खडकवासल्याकडे जाणार्‍या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. दरम्यानच्या काळात ह्युम पाईप ते फन टाईमपर्यंत अंतर्गत रस्ता करण्यात आल्याने धायरी कडे जाणार्‍या वाहनांची काहीशी सुविधा झाली आहे.

तसेच नुकतेच सिंहगड रस्त्यावर राजाराम पुल ते फन टाईमपर्यंत  उड्डाणपुलाच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे. तर वारजेकडून शिवणेकडे  जाणार्‍या रस्त्यावरही मोठ्याप्रमाणावर लोकवस्ती झाली आहे. कर्वे रस्ता तसेच राजाराम पुलापासून अंतर्गत गल्लीबोळातूनच वारजे व तेथून पुढे शिवणे, उत्तमनगरकडे जावे लागते.

वाहतुक कोंडीमुळे या गर्दीतून जाताना वेळ तर लागतोच परंतू इंधनही खर्चि पडते. यासाठी वारजे ते शिवणे दरम्यान नदी काठावर १.२ कि.मी.चा उड्डाणपुल उभारल्यास तेथील नागरिकांची सोय होणार आहे. परंतू या उड्डाणपुलाची सारी दारोमदार प्री फिजिबिलिटी रिपोर्ट व पर पर्यावरण अहवालावरच अवलंबून राहाणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News