सार्वजनिक जागा व रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी चांदबिबी महालावर महापालिका कायद्याला लाल फडक्यात गुंडाळून निषेधाची घोषणा


सार्वजनिक जागा व रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी चांदबिबी महालावर महापालिका कायद्याला लाल फडक्यात गुंडाळून निषेधाची घोषणा

महापालिकेचा कारभार काँक्रीट जंगल राज पद्धतीने चालत असल्याचा आरोप..तर आयुक्तांना पाठविणार काटेरी बुके

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- शहरात महापालिका सार्वजनिक जागा व रस्त्यांवर अतिक्रमण करणार्‍यांना अभय देत असल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला चांदबिबी महालावर महापालिका कायद्याला लाल फडक्यात गुंडाळून त्याला हळदीकुंकू वाहण्यात येणार आहे. तर महापालिकेचा कारभार काँक्रीट जंगल राज पद्धतीने चालत असल्याचे जाहीर केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक जागा व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. मात्र महापालिका प्रशासन सर्वसामान्य पथारी, हातगाडी वाल्यांवर कारवाईचा बडगा उगारुन स्वत:ची टिमकी वाजवत आहे. तर दुसरीकडे धनदांडग्यांचे पक्के अतिक्रमण पाडण्यास कानडोळा करीत आहे. सर्व नगरकरांच्या वतीने अतिक्रमण हटविण्यास असमर्थ ठरलेले महापालिकेचे आयुक्तांना चांदबिबी महाल परिसरातील काटेरी झाडा-झुडपांपासून बनवलेले काटेरी बुके पाठविण्यात येणार आहे. तर शहरातील सार्वजनिक जागा व रस्त्यांवर असलेले पक्के बांधकामांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात येणार आहे.दोन वर्षानंतरही प्रेमदान हडकोतील रस्त्यावरील गाळ्यांचे अतिक्रमण जैसे थे त्या परिस्थितीमध्ये आहे. प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी सं.नं. 109 मध्ये दक्षिण-उत्तर रस्त्यावर अनाधिकृत गाळे बांधून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिकांचा रहदारीचा रस्ता बंद झाला असून, नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे. एप्रिल 2019 मध्ये महापालिकेने सदर अतिक्रमण बेकायदेशीर विनापरवाना झाले असल्याचे जाहीर करुन पाडण्याचा हुकूम केला होता. दोन वर्षे उलटून देखील सदरचे अतिक्रमण पाडण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पाचशे वर्षांपूर्वीचे शहर असलेल्या अहमदनगरला संस्कृती व नीतिमत्ता आहे. मात्र महापालिकेचे अधिकारी नीतिमत्ता गहाण ठेऊन कारभार काँक्रीट जंगल राज पद्धतीने चालवित आहे. आर्थिक हित साधले जात आहे. अतिक्रमणधारकांकडून आर्थिक हित साधून त्यांना संरक्षण देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप अ‍ॅड. गवळी यांनी केला आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News