मोठी कारवाई!! 25 लाखाच्या मुद्देमालासह आठ दिवसांच्या आत आरोपीना केले अटक श्रीगोंदा पोलिसांची कारवाई


मोठी कारवाई!! 25 लाखाच्या मुद्देमालासह  आठ दिवसांच्या आत आरोपीना केले अटक श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा  प्रतिनिधी : अंकुश तुपे- दि.२१: मनमाड- बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय मालगाड्या अडवून ट्रक चालकाला धमकावत ट्रक मधील माल लंपास करणाऱ्या चोरट्यांना श्रीगोंदा पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे तपास करत अटक करून त्यांच्याकडील २५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


       याबाबत सविस्तर माहिती अशी की परप्रांतीय ट्रक चालक निलेश चतरसिंग लोदी (वय १९ वर्षे) रा.बधोरीया जि. शिवपुरी, मध्यप्रदेश  हे दि. ६ जुलै रोजी कन्नोज (उत्तर प्रदेश) येथुन ३० टन मका धान्य भरलेली ट्रक( एम.पी.०९ एच.एच.९५३२) घेऊन सांगली येथे पोहोचविण्यासाठी चालले असता दि. १४  जुलै रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेटच्या पुढे त्यांची ट्रक अज्ञात आरोपींनी  अडवली व धमकावत बळजबरीने बाबुर्डी शिवारातील वस्तीजवळ घेवुन गेले. आरोपींनी आधीच तयार ठेवलेल्या चौदा टायर ट्रकमध्ये परप्रांतीय ट्रकमधील २५ टन मका पोते

बळजबरीने भरुन आरोपी पसार झाले. याबाबत ट्रकचालक निलेश लोदी यांनी दि.११ जुलै रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस तपास चालू असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त खबऱ्याने माहिती दिली की मका चोरण्याकरीता आरोपींनी बारा टायरचा ट्रक वापरला आहे. पोलिस निरीक्षक रामराम ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पथक नेमले. पथकाने दौंड,काष्टी,मांडवगण,हंगेवाडी,मढेवडगाव परिसरातील नागरिकांकडे चौकशी करत या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर काष्टी गावात ट्रक आढळला. ट्रकमध्ये मक्याचे दाणे सापडल्याने संशय अधिक बळावला. संपूर्ण माहीती व तांत्रिक विश्लेषण केल्यावर  आरोपी आर्यन शंकर कांबळे (वय २४ वर्षे) रा.सांगवी ता.फलटण जि.सातारा, संजय बबन कोळपे (वय ४६ वर्षे) रा. बोरी ता.श्रीगोंदा, गणेश श्रीमंत गिरी (वय २५ वर्षे) रा.श्रीगोंदा कारखाना, भाऊसाहेब गंगाराम पालवे (वय २१ वर्षे) रा.श्रीगोंदा कारखाना व अजून एक जण सामील असलेल्या आरोपींनी गुन्हा केल्याचे उघड झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरलेली २५ टन वजनाची मका पोते,  गुन्ह्यात वापरलेला ट्रक ( एम एच २६ सी सी ५९८२), एक मोटारसायकल (एम एच १४ सी व्ही ५४३०), ट्रक चालकाचा चोरलेला मोबाईल असा मिळून २५ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यातील आरोपी आयर्न शंकर कांबळे याला सांगली पोलिसांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे. त्याच्यावर यापूर्वी वडगाव निंबाळकर, फलटण पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास अत्यंत क्लिष्ट व गंभीर प्रकारचा असतानाही गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याने श्रीगोंदा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी, मुख्य पोलीस हवालदार अंकुश ढवळे, पोलिस हवालदार दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, अमोल कोतकर, वैभव गांगर्डे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी व पोलिस हवालदार वैभव गांगर्डे करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News