इंधन दरवाढ मागे घ्या अन्यथा कामगार व शेतकरी तीव्र आंदोलन करतील.....डॉ. कैलास कदम


इंधन दरवाढ मागे घ्या अन्यथा कामगार व शेतकरी तीव्र आंदोलन करतील.....डॉ. कैलास कदम

विशेष प्रतिनिधी विठ्ठल होले :पिंपरी, पुणे (दि. 8 जुलै 2021) केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारने मागिल सात वर्षात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल शंभरी पार झाले असून दररोज गॅसच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना, शेतक-यांना, कष्टकरी कामगारांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली आहे. वाढत्या महागाईमुळे रोजगार संपुष्टात येत असून बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामिण भागातही गुन्हेगारी वाढत आहे. या मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के, पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी आणि 18 रुपये रस्ते विकास सेस 4 रुपये कृषी विकास सेस लावला आहे. सर्व सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. हि महागाई व इंधन दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कष्टकरी कामगार व शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.

      केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. 8 जुलै) इंटकच्या वतीने आकुर्डीत तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. यानंतर आकुर्डीतील तहसिल कार्यालयापासून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी कॉंग्रेस नेते अमित मेश्राम, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसिम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव कौस्तुभ नवले, महिला संघटिका भारती घाग, ज्येष्ठ नागरीक आंनदा फडतरे आणि इंटक युवक कॉंग्रेस, एनएसयुआय तसेच सेवादलाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील कामगार बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी अमित मेश्राम, नरेंद्र बनसोडे, विश्वास गजरमल यांनीही केंद्र सरकारवर टिका करणारी भाषणे केली.

        डॉ. कैलास कदम पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना मोदी सरकार भरमसाठ कर लावून जनतेला लुटत आहे. पेट्रोल, डिझेलवरील करामधून मागील 7 वर्षात तब्बल 22 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केंद्र सरकारने केली आहे. करांशिवाय पेट्रोलची किंमत 32 रुपये आणि डिझेल 33 रुपयांपर्यंत प्रतिलिटर मिळाले पाहिजे. भरमसाठ करामुळे पेट्रोल, डिझेल शंभरीपार झाले आहे. तर एलपीजी सिलेंडर सुध्दा 850 रुपयांच्या पुढे गेला आहे. खाद्य तेलाचे भावही 200 रुपये लिटर आणि डाळींचे भाव देखिल प्रचंड वाढले आहेत. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई या दुष्टचक्रात सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी इंधन दरवाढ व अतिरिक्त कर मागे घ्यावेत अन्यथा कष्टकरी कामगार शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.

सुत्रसंचालन डॉ. वसिम इनामदार आणि आभार उमेश खंदारे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News