शासकीय निवासस्थानावर बेकायदेशीर कब्जा करून दहशत माजवणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाठींबा कोणाचा?


शासकीय निवासस्थानावर बेकायदेशीर कब्जा करून दहशत माजवणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाठींबा कोणाचा?

खडकवासला पाटबंधारे उपविभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

दौंड : येथील खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्र. 1 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गैरकारभार चालला असून येथील शासकीय निवासस्थानावर 2002 पासून सेवानिवृत्त झालेले 16/17 कर्मचारी बेकायदेशीररित्या कब्जा करून राहत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना अनेकवेळा निवासस्थान रिक्त करण्यास सांगितले असता दहशतीच्या जोरावर ते कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या मुजोरपणाला नक्की कोणाचे पाठबळ मिळत आहे? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे.

     खडकवासला पाटबंधारे उपविभागाच्या सदर भोंगळ कारभाराबाबत वेळोवेळी संबंधित वरिष्ठांना लेखी तक्रार करून, वृत्तपत्रांद्वारे आवाज उठवूनही काहीच फरक पडलेला नाही. याउलट तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला फरक पडत नाही असाच आविर्भाव येथील शासकीय अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वागण्यात दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठांमध्ये व सदर कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक लागेबंधे असल्याची शंका येत आहे. 2015 पासून केवळ नोटीसा देऊन नाममात्र कारवाई करून सोपस्कार पूर्ण केल्याचे येथील सहाय्यक अभियंता सुहास साळुंखे दाखवत आहेत. तर या सर्व प्रकरणाची कल्पना असूनही सहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव चोपडे हे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप येथील इतर पीडित कर्मचारी करत आहेत.

     सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणा, दमदाटी आणि दहशतीमुळे सध्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत असून लांबून कामावर येणाऱ्या गरजुंचे हाल होत आहेत. पात्र असूनही त्यांना निवासस्थानापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच यात खालपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांचेच अर्थपूर्ण संबंध असल्याने दाद मागावी कुणाकडे? असा दिनवाणा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि दाद मागितलीच तर नोकरी जाण्याची भीती असल्याने याबाबत बोलण्यासाठी सेवेतील कोणताच कर्मचारी पुढे येत नसल्यामुळे या मूर्दंडांचे फावत आहे.

     त्यामुळे वर्षानुवर्षे शासकीय निवासस्थानात "सरकारी मालमत्ता आपल्याच बापाची" असल्याचा गैरसमज करून घेत फुकटचे ठाण मांडून बसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या मुजोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायदेशीर मार्गाने पोलीस बंदोबस्तात बाहेर काढून हाकलून द्यावे अशी मागणी येथील पीडित कर्मचारी व नागरिक दबक्या आवाजात करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News