आधी पैसे भरा मग खंडोबाचे दर्शन करा... जेजुरीत सुरू झाला नवीन धंदा


आधी पैसे भरा मग खंडोबाचे दर्शन करा...  जेजुरीत सुरू झाला नवीन धंदा

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : जेजूरी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देवदर्शन करण्यासाठी भक्तांना मंदिरांची दारं बंद ठेवण्यात आली आहेत. जेणेकरून मंदिरामध्ये गर्दी होऊ नये हाच एक उद्देश. देवावरील अस्सीम भक्तीमुळे भाविक कळसाचे का असेना दर्शन घेण्याकरिता मंदिरात येत आहेत. परंतु देवाचे दर्शन न झाल्यामुळे भाविक भक्तगण नाराज होत आहेत. भक्तांची हिच नाराजी ओळखून मंदिरांमध्ये देवाच्या आसपास असणाऱ्या दलालांनी मात्र आता नवीनच धंदा सुरू केला आहे. देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर पैसे भरायला सांगून आत प्रवेश देत आहेत. यात मंदिर व्यवस्थापनाला हाताशी धरून पोलीस प्रशासन व मंदिराबाहेरील हार नारळ विकणाऱ्या काही दुकानदारांनी ही नवी शक्कल लढवली आहे. असाच काहीसा प्रकार अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दिसून येत आहे.

     पंचक्रोशीतील नवविवाहीत जोडपे लग्न झाल्यानंतर प्रथम कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या दर्शनाला जेजुरीला येतात. रीतीप्रमाणे नवरीला उचलून घेत पाच पायऱ्या चढण्याची प्रथा येथे आहे. परंतु सध्या देशभर मृत्यूचे थैमान घातलेल्या कोरोना रोगाचे कारण सांगून जोडप्यांना प्रवेशद्वारावरच अडवले जात आहे. त्यातही पर्याय म्हणून पाचशे रूपये भरून कोरोनाच्या कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय नवरा-नवरीला आत पायरीपर्यंतच प्रवेश दिला जात आहे. अशावेळी पैसे भरल्यानंतर मात्र कोरोना कुठे गायब होतो हा प्रश्न पडत आहे. यावेळी इतर कोणी काही बोलू नये म्हणून प्रवेशद्वाराजवळ एकमेव हार नारळ विकणारा दुकानदार लोकांना दमदाटी करून, जबरदस्तीने तिथून हाकलून देत आहे.

     दिवसाढवळ्या मंदिरात घडणाऱ्या अशा लुटमारीच्या प्रकारामुळे जेजुरीत दर्शनाला येणारे भाविक वैतागले आहेत. सदर प्रकारामुळे जेजुरी देवस्थानची बदनामी होत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी व मंदिर व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News