सिद्धेश्वर टेकडीवरील ऑक्सिजन पॉईंटवर जाऊन वडाच्या झाडाची पूजा


सिद्धेश्वर टेकडीवरील ऑक्सिजन पॉईंटवर जाऊन वडाच्या झाडाची पूजा

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे :

शिरूर: वृक्षारोपण करून तसेच वृक्ष व पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन येथील जिजाऊ ब्रिगेड,आदिशक्ती महिला मंडळ व वैभवी ग्रुपच्या महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली.वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे.मात्र या महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतानाच पर्यावरण रक्षणासाठी प्रार्थना करून त्याचे महत्त्वही अधोरेखित केले. 

         वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करतात.तसेच महिला वडाचे झाडही लावतात.यावरून यादिवशी अप्रत्यक्षरीत्या वृक्षारोपणाचा संदेशही दिला जातो.सध्याच्या परिस्थितीत वृक्षारोपणाची निंतांत गरज असल्याचे चित्र आहे.शासन यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे.तरीही नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे वास्तव आहे.येथील सिध्देश्वर टेकडीवर येथील वृक्ष प्रेमींनी (सिध्देश्वर वनीकरण समिती) पाच हजाराहून अधिक झाडे लाऊन त्याचे मोठ्या कष्टाने संवर्धन केले आहे.यामुळे एकेकाळी ओसाड असलेली ही टेकडी हिरवीगार झाली आहे. कष्टाने जोपासलेल्या या झाडांची सध्या काही विध्वंसक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून कत्तल होतानाचे दुर्दैवी चित्र आहे.आज वटपौर्णिमेनिमित्त ब्रिगेड,जिजाऊ आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी या प्रवृत्तींचा निषेध करतानाच सिध्देश्वर समितीच्या वृक्ष संवर्धन चळवळीला पाठिंबा देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.आज  आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी सिध्देश्वर टेकडीवरील ऑक्सिजन पॉइंटवर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करतानाच जिथे झाडांची कत्तल झाली त्याठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करून झाडांची कत्तल करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला.मोठ्या कष्टाने जोपासलेल्या झाडांची  कत्तल करणाऱ्यांची विकृत मानसिकता असून त्यांच्या या विकृत कृत्यामुळे वृक्षारोपण व संवर्धन चळवळ कदापि खंडित होणार नाही अशी प्रतिक्रिया आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे यांनी व्यक्त केली. झाडांची कत्तल करणाऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी काळे यांनी केली.

जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवार,  लता नाझीरकर, स्वाती थोरात,सुवर्णा सोनवणे,अनुपमा दोषी,राजश्री ढमढेरे, अपेक्षा गवारे,वैशाली ठुबे,,साक्षी सारडा,नवकार कोठारी,मेजर दहातोंडे,जनविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार वेताळ, डॉ.अतुलकुमार बेद्रे,संजय घागरे ,संतोष ढमढेरे,रमेश देशमुख,अर्णव बेंद्रे ,विजय देशमुख ,संतोष साळी बाळासाहेब थिटे,राज वारके आदी यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News