नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी


नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- शहराच्या उत्तरेला लागून असलेल्या नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात तरुण असलेले नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अतिशय कार्यक्षमतेने कार्य करीत आहेत. याचा जनतेला जास्तीत जास्त फायदा होत आहे. मागील आठवड्यात त्यांनी नागरदेवळे आणि आजूबाजूच्या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे वक्तव्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. याच धर्तीवर नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन केल्यास शहरासह शहरालगत असलेल्या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. त्यांनी दाखवलेला दूरदृष्टीकोन व विकासात्मक व्हिजनचे  संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.शहरालगत असलेला परिसर अनेक वर्षे नागरी विकासापासून वंचित राहिलेला आहे. या परिसराला न्याय देण्यासाठी तनपुरे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. सदर भागात स्वतंत्र नगरपालिका स्थापन झाल्यास गावाचा विकास होऊन हजारो घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून स्वस्त घराचे स्वप्न साकार होणार आहे. शहराच्या उत्तरेला पाच ते सहा किलोमीटर महानगरपालिका हद्दीला लागून नवनागापूर, वडगाव गुप्ता, गावे आहेत. एमआयडीसी जवळ असल्याने या भागाचा विकास झाला आहे. परंतु अतिशय नियोजनबद्ध नागरी विकासासाठी या चार गावांना स्वतंत्र नगरपालिकेची गरज आहे. नवनागापूर हा भाग अतिशय दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. या भागाला वीज, पाणी, रस्ते अशा प्राथमिक सोयी आहेत. परंतु प्लॅनिंग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील काळात या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या तयार होतील. त्यामुळे या चार गावासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे. या चारही गावांमध्ये असलेली लोकसंख्या नगरपालिका होण्यासाठी पुरेशी आहे. त्यातून या भागांमध्ये नागरी विकास वेगाने होऊ शकणार आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये हा चांगला व विकासात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. अहमदनगर शहरामध्ये वीस हजार पेक्षा जास्त लोकांची बेघर म्हणून अहमदनगर महापालिकेत नोंद आहे. परंतु त्यांना आजपर्यंत घरे मिळाली नाहीत. यामुळे या नव्या स्वतंत्र नगरपालिका क्षेत्रात जागांचे भाव कमी राहणार असल्यामुळे हजारो बेघरांना घर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गावातील ग्रामस्थांना देखील या निर्णयाला पाठिंबा असून, नवनागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News