चंदेरी दुनियेतला नवा लोभसवाणा चेहरा : प्राजक्ता पार्टे


चंदेरी दुनियेतला नवा लोभसवाणा चेहरा :  प्राजक्ता पार्टे

मराठमोळ्या प्राजक्ताचा चंदेरी दुनियेतील संघर्षमय जीवनप्रवासमिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

मुंबई : येथे २६ जाने. १९९६ ला जन्मलेल्या प्राजक्ता पार्टे या मराठमोळ्या व गुणी अभिनेत्रीचा चित्रपट क्षेत्रातील प्रगतीचा प्रवास संघर्षमय व तितकाच रंजक आहे. 

     सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हातेघर हे मूळ गाव असलेल्या प्राजक्ताने मास मीडियामध्ये डिग्री मिळवली आहे. तिला गायन, नृत्य व अभिनयाची देखील आवड आहे. तिचं संपूर्ण बालपण मुंबईतील भांडूप येथे गेलं. तिला लहानपणापासूनच कलाक्षेत्राची जास्त ओढ होती. शालेय जीवनात आणि त्यानंतर महाविद्यालयात असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा यांच्यामध्ये तिने भाग घेणं चालू केलं. पुढे महाविद्यालयात असतानाच सोहम प्रोडक्शन यांच्या "लक्ष" या मालिकेसाठी तिने ऑडिशन दिली. इथूनच खऱ्या अर्थाने तिच्या छोट्या पडद्यावरील प्रवासाची सुरवात झाली. त्यानंतर तिने बऱ्याच सिरीयल, शॉर्ट फिल्म, वेबसिरीजमध्ये काम केलं. सध्या ती "कोरी पाटी मनोरंजन मंडळ" या प्रोडक्शनच्या "जमलं तर जमलं" या वेबसिरीजमध्ये काम करत आहे. यामध्ये ती "मीना" नावाचं पात्र साकारत आहे. या व्यतिरिक्त तिने अनेक रॅम्प शो आणि ब्रॅण्ड शो केले आहेत. याचा प्रभाव आणि फायदा बऱ्याच ठिकाणी तिला झाला. या सोबतच ती स्वतः "इव्हेंट मॅनेजमेंट" करते.

प्राजक्ताची जन्मभूमी जरी मुंबई असली तरी कर्मभूमी ही तशी पाहता नक्की कोणती आहे हे सांगणं थोडसं कठीणच आहे. कारण तिचा बराचसा  वेळ हा सातारा, कोल्हापूरमध्ये गेला आहे.

      बऱ्याचदा तिला परिवारातील आणि समाजातील काही लोकांकडून फिल्म इंडस्ट्री वाईट आहे तिकडं जाऊ नकोस अशा पद्धतीचे नकारात्मक विचार ऐकावे लागले. आपल्या या कलाक्षेत्रातील संघर्षमय प्रवासाविषयी बोलताना ती म्हणते, मी माझ्या निर्णयावर अगदी ठाम आहे. यामध्ये माझे आई-बाबा माझ्या नेहमीच सोबत असतात आणि मला प्रोत्साहन देत असतात.

त्यांच्याच आधारामुळे आत्तापर्यंतचा हा सारा प्रवास शक्य झाला. या प्रवासात माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षक वर्गाचंही तेवढंच मोलाचं योगदान आहे. यापुढेही असंच प्रेम आणि प्रतिसाद मिळेल हे अपेक्षित आहे. या कोरोनाच्या काळात साऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. तुमचं मनोरंजन करण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावर आनंद टिकवण्यासाठी यापुढेही मी अशीच प्रयत्नशील राहीन.

     एकूणच प्राजक्ताच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला हा नवा गोंडस, लोभसवाणा चेहरा अल्पावधीतच आपल्या सहज सुंदर अभिनयाने चंदेरी दुनियेत आपले एक वेगळे स्थान निर्माण करेल हे निश्चित.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News