गावठी मॅटर वेब सिरीजचे ५० भाग पूर्ण...साताऱ्यात सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न


गावठी मॅटर वेब सिरीजचे ५० भाग पूर्ण...साताऱ्यात सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

सातारा : अगदी कमी वेळात यशाच्या शिखरावर पोहोचायचं म्हणजे त्यामागे मेहनतही अफाट असते. गावठी मॅटर वेब सिरीजने अगदी कमी वेळात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ५० भागांची यशस्वी वाटचाल पूर्ण झाल्यावर गावठी मॅटर वेब सिरीजचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता जितेंद्र अरविंद पवार यांनी काहीतरी नविन विचार मांडण्याच्या हेतूने पाऊले उचलायचं ठरवलं. त्याच पार्श्वभूमीवर सुवर्ण महोत्सवी सोहळा यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे यशस्वीरीत्या पार देखील पडला. पण पुढे प्रेक्षकांना गावठी मॅटर रिटर्न्स म्हणजेच गावठी मॅटरच्या दुसऱ्या पर्वाची ओढ लागली. शूटिंग सुरू होणार तेवढ्यात कोरोना विषाणूने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत सुरक्षिततेच्या हेतूने गाववाडी प्रॉडक्शनने देखील गावठी मॅटर रिटर्न्सचे चित्रीकरण थांबवले. पण जून २०२० मध्ये अटी व शर्तींसह काही नियम शिथिल होताच चित्रीकरणासाठी पाऊले उचलण्यात आली. परंतु गावठी मॅटरचे चित्रीकरण होत असलेल्या ठिकाणाहूनही  चित्रीकरणासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. पण थांबणं हे या गावच्या तरुणांच्या रक्तात नाही. बऱ्याच अडचणींना तोंड देत गावठी मॅटरच्या शूटिंगला सुरुवात झाली. चाफळ श्री राम मंदिराच्या पवित्र पावन भूमी परिसरात  गावठी मॅटरच्या दुसऱ्या पर्वाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली.

     गाववाडी प्रॉडक्शनचे निर्माते जितेंद्र पवार यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले "प्रत्येकाच्या अंगी कलागुण असतातच. गावाकडच्या मुलांमध्ये नैसर्गिक कला आहे आणि त्या कलागुणांना समाजातून वाव मिळायला हवा, विरोध नको." गावठी मॅटर रिटर्न्स मध्ये प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहे.

आणि त्याच बरोबर गावठी मॅटर सारखेच रिटर्न्समध्येसुद्धा मनोरंजनातून सामाजिक बांधिलकी जपण्याकडे जास्त भर दिला गेला आहे.

     गावठी मॅटर वेब सिरीजमध्ये जितेंद्र पवार हे लेखक, दिग्दर्शक, संपादक तसेच सोन्या नावाची प्रमुख भूमिका बजावत आहेत. त्याचबरोबर भांडुप (मुंबई) ते सातारा हा प्रवास आपल्या कलेतून पूर्णत्वास नेणारी अभिनेत्री पूजा संसारे आपली प्रमुख भूमिका सपनी सोबतच सहाय्यक दिग्दर्शिकेची  जबाबदारी सांभाळत आहे. वर्षा कांबळे, सोबतच विनोदी भुमिका साकारणारे किरण पवार, निलम जाधव, सतीश डांगे आहेतच. त्यासोबतच अविनाश संभाजी जाधव (सैतान), राम कदम, अर्जुन डांगे, किरण रोहिदास, रोहिणी ताजनेकर, आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कोवळ्या वयात बालकलेची मोहर उमटीवणारे राहत नदाफ, ओम पानस्कर, विजय डांगे इ. सहकलाकारांचा समावेश आहे.

गावठी मॅटर वेब सिरीजने केवळ ८ महिन्यात यु ट्यूब सिल्वर प्ले बटन पुरस्कार मिळवला आणि सातारा जिल्ह्याचं नाव जगाच्या पाटीवर दिमाखात कोरलं. कोल्हापूर नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच शिवराजे प्रतिष्ठान भांडुप(पूर्व) मुंबई, फ्लोरा इन्स्टिट्यूट खेडशिवापुर (पुणे), चिंतामणी कलामंच दादर (मुंबई) अशा बऱ्याच नामवंत संस्थांकडून गावठी मॅटरच्या टीमचा गौरव करण्यात आला. थोडक्यात काय तर एका गरीब कुटुंबातील तरुणाने निर्माण केलेल्या गाववाडी प्रॉडक्शन प्रस्तुत गावठी मॅटर या वेब सिरीजचा मोठमोठ्या शहरात देखिल गौरव झाला ही साताऱ्याच्या इतिहासात गौरवशाली बाब आहे.

     गावठी मॅटर वेब सिरीज दिवसेंदिवस लॉकडाउनमध्ये सुद्धा अजूनच जास्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

प्रत्येक भागातून गावच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय. त्यामुळे व्यवसाय नोकरी निमित्त गाव सोडून मोठमोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना गावठी मॅटर वेब सिरीजमुळे गावचा सहवास अनुभवायला मिळत आहे. या सोबतच मनोरंजनातून सामाजिक संदेश दिला जातो. त्यामुळे प्रत्येक नवनवीन भागांना एका दिवसात एक लाखांहून अधिक व्ह्यूव मिळत आहेत. तसेच कमी वेळात गाववाडी प्रॉडक्शन या यू ट्यूब चॅनलचे २ लाख ५० हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झाले आहेत.

      लवकरच गाववाडी प्रॉडक्शन प्रस्तुत यु ट्यूब चॅनेलवर अजून नविन संकल्पना आणि नविन गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि खेड्या-पाड्यातील कलाकारांच्या कलेला संधी आणि वाव मिळणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News