ऊर्जा उत्तम लाभासाठी प्रत्येक जिल्ह्यात सिंगल विंडो सिस्टीम उभारणार


ऊर्जा उत्तम लाभासाठी प्रत्येक जिल्ह्यात सिंगल विंडो सिस्टीम उभारणार

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

जालना, दि. 12 (जिमाका):-  भविष्यातील  वीजेची वाढती मागणी लक्षात घेत त्यानुसार आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करून वीजेचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून वीजेच्या बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन मराठवाड्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.


जालना तालुक्यातील उटवद व घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे 132 के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्री श्री. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेश जेथलिया, अरविंद चव्हाण, राजाभाऊ देशमुख, कल्याण सपाटे, मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, अधीक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण, मिलिंद बनसोडे, संजीव कांबळे तर तीर्थपुरी येथील कार्यक्रमास जि.प. चे उपाध्यक्ष महेंद्र पवार, कल्याणराव सपाटे, उत्तम मामा पवार, डॉ. निसार देशमुख, मनोज मरकड, भागवत रक्ताटे, बन्सीधर शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.


ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, मराठवाड्यातील वीजेची असलेली परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपण मराठवाड्याचा दौरा करत असून वीजेच्या बाबतीमध्ये मराठवड्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन वीजेच्या बाबतीत मराठवाड्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.  उटवड येथे 132 के.व्ही. उपकेंद्र  हे राजेश भैया टोपे हे ऊर्जामंत्री असताना मंजूर करण्यात आले होते. हे उपकेंद्र या ठिकाणी व्हावे यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांनी पाठपुराव्याने तसेच या भागातील नागरिकांच्या मागणीमुळे या केंद्रासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत या उपकेंद्राचे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत असल्याचे सांगत या उपकेंद्राच्या माध्यमातून या परिसरातील 90 गावांना योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होणार आहे. तसेच तीर्थपुरी येथील उपकेंद्रासाठीही 42 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन यामुळे परिसरातील अनेक गावांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही उर्जामंत्री श्री राऊत यांनी यावेळी सांगितले.


ऊर्जा विभागामार्फत कृषीपंपाना वीज जोडणी, मुख्यमंत्री सौरयोजना यासारख्या अनेक योजना राबविण्यात येत असुन पीएम कुसुम योजनाही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे सांगत या योजनांचा लाभ सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सिंगल विंडो सिस्टीमही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.  वीजेच्या उत्पादनापासुन ते पुरवठ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते.  यासाठी वीज वापरणाऱ्या प्रत्येकाने वीजदेयक भरण्याचे आवाहनही ऊर्जामंत्री श्री राऊत यांनी यावेळी केले.


मुख्यमंत्री सौर योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातुन 23 अर्ज प्राप्त झाले असुन या अर्जासोबत विद्युत विभागाशी निगडीत असलेल्या विकास कामांना मंजुरी देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगत राज्यातील सर्वसामान्यांना सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यादृष्टीने विद्युत विभाग पुर्ण क्षमतेने काम करत असुन लॉकडाऊनच्या काळात विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करत सामान्यांना अखंडित व सुरळीतपणे चोवीस तास वीजेचा पुरवठा करण्यात आल्याचेही ऊर्जामंत्री श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News