तत्त्वज्ञानी, न्यायदात्या : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३१ मे जयंती विशेष 


तत्त्वज्ञानी, न्यायदात्या : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३१ मे जयंती विशेष 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) एक अतिशय कर्तृत्ववान दानशूर व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे नाव भारताच्या  इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे, 

करण्या आदर्श असे कार्य। 

घेतात जन्म पृथ्वीतलावर।। 

बोटावर मोजण्या इतकेच।

 लोक होती अमर  ।। 

भारतात आजपर्यंत अनेक शूर -वीर महिला होऊन गेल्या आहेत ,त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा भारतभूमीवर उमटवला आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वा मुळे  अनेक युवकांना -युवतींना प्रेरणा मिळाली आहे,अशा महान तत्वज्ञानी व न्यायदात्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज २९६ वी जयंती आहे, 

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आई सुशीलाबाई व वडील  माणकोजी शिंदे यांच्या पोटी झाला, 

मल्हारराव होळकर हे गनिमी काव्याच्या युद्धनीती मध्ये अतिशय चपळ व कर्तबगार होते, आणि ते  इंदौरच्या  सत्तेचे संस्थापक ही होते,  त्यांच्याच मुलगा वीर सरदार खंडेराव यांच्यासोबत अहिल्याबाईचा विवाह १७३३ मध्ये  झाला, मध्यम उंचीच्या सावळया वर्णाच्या सदैव डोईवर पदर घेतलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन देणा-या  एक, गुणवान महिला होत्या, त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली होती , मुक्ता ही बुद्धीमान शीलवान व गुणवान मुलगी  होती,, अहिल्याबाईंनी मुक्ताबाईचा स्वयंवरासाठी नर्मदा नदीकाठी असलेली आपली राजधानी महेश्वर येथे सर्व सेनाप्रमुख, सरदार मंडळी व गावोगावचे प्रमुख मंडळी बोलावून विशाल दरबार भरवून घोषित करताना जाहीर केले की,  जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीशी माझ्या  एकुलत्या एक  मुलींचा मी विवाह करून देईन,  त्यावेळी 

 यशवंतराव फणसे यांनी राज्यातील सर्व गुन्हेगारांचे निर्दयपणे पारिपत्य केले व विजयश्री खेचून आणली त्यामुळे  दिलेल्या वचनानुसार  अहिल्याबाई होळकरांनी राजकन्येचा  विवाह यशवंतराव फणसे सोबत लावून दिला, इकडे मल्हारराव होळकर, सरदार खंडेराव यांनी १७५४ मध्ये जाट लोकांकडून चौथाई वसुल करण्यासाठी गेले, तेथे काही शाब्दिक चकमकी उडाल्याने युद्धाची घोषणा केली गेली, आणि कुंभेरीच्या किल्ल्यास वेढा देण्यात आला, २४ मार्च १७५४ रोजी लढाई सुरू झाली आणि एका काळरुपी गोळीने वीर खंडेरावाच्या छातीत प्रवेश केला, आणि खंडेराव धारातीर्थी पडले, ही घटना वा-यासारखी  सर्वत्र पसरली आणि मल्हारराव होळकर  बेभान होऊन पळत सुटले आणि ते उदगारले, सूरजमलाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत  टाकीन, नाहीतर प्राण त्याग करीन  ही गोष्ट सूरजमलला कळाली तेव्हा तो ६० लाख खंडणी देऊन मराठयाशी तह केला, त्यावेळी अहिल्याबाई सती जाण्यासाठी निघाल्या तेव्हा मल्हारराव होळकरांनी आपण सती जाऊ नयेत, म्हणून त्यांचे मतपरिवर्तन केले, लोकनिंदेचा विचार न करता प्रजाहितासाठी सती न जाण्याचा निर्णय  अहिल्याबाई होळकरांनी घेतला आणि वीर खंडेरावांची उत्तरक्रिया करून टाकण्यात आली, आणि अहिल्याबाईच्या हाती इंदौरच्या राज्यकारभाराची सूत्रे दिली, पोटच्या मुलाचे दु:ख विसरून मल्हारराव  अहोरात्र परिश्रम करत होते, अचानक एकेदिवशी प्रकृती बिघडली, सर्व औषधे निष्फळ ठरले, शेवटी १७६६ मध्ये या महापराक्रमी वीरपुरूषाने जगाचा कायमस्वरूपी निरोप घेतला, आणि तेव्हापासून अहिल्याबाई

 होळकरांनी कधीही ऐषआरामी जीवन जगल्या नाहीत, त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या, समाजात राहून समाजाच्या समस्या माहिती करून घेतल्या,आणि कार्याला सुरुवात केली, 

वाटसरूंना वाटेने जाताना तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी पाणपोई उभारण्यात आल्या, चालून चालून  थकल्यानंतर  रात्रीच्या वेळी आरामासाठी धर्मशाळा बांधल्या, व्यापार करण्यासाठी व्यवसायकांना बाजारपेठाची स्थापन करून दिल्या, स्वत:ची टाकसाळे निर्माण केली, 

न्यायाच्या बाबतीत त्या अतिशय कठोर होत्या, तुकोजी होळकरांच्या मुलाला ही त्यांनी कठोर शासन केले, 

दानधर्मात त्या खूपच दानशूर होत्या सर्व प्रकारच्या जातीधर्मातील लोकांना त्यांनी सढळ हाताने अन्न, रोख रक्कम , कपडे नेहमी देत असत, म्हणूनच त्यांना सर्वजण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे म्हणतात,

 भारतातील चार ही दिशांना मंदिरे बांधून लोकांच्या श्रध्देची जोपासना केली, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली, अनेक जुनाट कायदे बदलून नवे कायदे करून देण्यात आले , शेतकऱ्यांना शेतसारा व कर वसुली या जाचक करातून मुक्त केले, गोपालनाचे महत्त्व पटवून दिले , शेतक-याच्या उध्दारासाठी व शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळवुन देण्यासाठी तलाव ,तळी विहीरी खोदून दिल्यामुळे  डोंगराळ भाग, पडीक जमीन लागवडीखाली आणली त्यामुळे  शेतकरी राजा सुखी झाला,अंधश्रद्धेचे निवारण करण्यासाठी समाजात असलेले गैरसमज दूर केले, राघोबादादा आणि यशवंतराव चंद्रचूड  यांनी ५० हजार सैन्य घेऊन उज्जैन पर्यंत धडक मारली ,  तितक्यात त्यांना अहिल्याबाई होळकरांनी पाठवलेले पत्र मिळाले, त्यात लिहिले होते, माझ्या अधिपत्याखाली मी तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी समर करेल, माझा पराभव झाला तर  मला  कोणीही हसणार नाही,पण तुम्ही पराभूत झाला  तर  तुम्हाला तोंड लपविण्यासाठी जागा मिळणार नाही,  हे ऐकून राघोबादादा युद्धासाठी  आलेच नाही,आपल्या बुद्धी चातुर्याने आणि मुत्सद्दी पणाने राघोबादादाचे  कुटील डाव उधळून लावले , नेमाडमधील लुटारू भिल्लांना चांगले मार्गदर्शन करून त्यांच्यात मतपरिवर्तन केले, १७८८ मध्ये  मंदसौर येथे अहिल्याबाई होळकर व राजपूत यांच्या मध्ये घनघोर युद्ध झाले त्यात राजपुतानाचा  पराभव झाला,ज्यांच्या मनगटात बळ, बुद्धी, आणि चातुर्य आहे ती व्यक्ती स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राज्यकर्ती बनू शकते, हे दाखवून दिले, सकंट प्रसंगी मराठी सैन्याच्या लष्करी मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, तसेच समाजपयोगी केलेल्या कार्याच्या रूपाने आजही त्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत, वाराणसी, नाशिक,वृदावन, सोमनाथ,गया, रामेश्वर, या ठिकाणी मंदिरे, मठ,घाट बांधले, या काळात त्यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले, पंढरपूर,कोल्हापूर जेजुरी,वेरूळ, पुणे ओझर रावेर,नळदुर्ग येथे खंडोबाचे नवीन मंदिरे बांधली, काही ठिकाणी अन्नछत्रे उभारले, भारताच्या पवित्र नदी तीरावर बांधलेले घाट व त्यांच्या जनहिताची व लोकोपयोगी कामाची साक्ष देतात,मानवतावादी कल्याणकारी विचारामुळे  त्यांचे आजही स्मरण होते,तसेच कलकत्ता ते वाराणसी हा मार्ग बांधून व्यापाराला गती आणण्यात आली,अहिल्याबाई होळकरांना  पुराणे वाचण्याची व श्रवणाची आवड होती, त्यांच्या कडे भागवत,गीता गोविंद, ज्ञानेश्वरी ,रामायण,महाभारत,रघुवंश विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश चिंतामणी इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित पोथ्या तयार करून घेतल्या होत्या,म्हणून त्यांना ग्रंथप्रेमी अहिल्याबाई असेही म्हणतात, कारागीरांना त्यांनी आश्रय दिला होता,  कधी कधी मानवाच्या मागे  संकटामागुन संकटे येत असतात,  आणि संकटाची मालिकाच सुरू होते  

 सुरूवातीस त्यांचे  पती, नंतर सासरे मल्हारराव त्यानंतर मुलगा व नातु, आणि शेवटी जावई मरण पावले आणि  मुलगी लगेच सती गेली,एवढे जण त्यांच्या समोर मरण पावले, तरीही अहिल्याबाई होळकरांनी राज्यकारभाराची सूत्रे प्रभावी पणाने सांभाळली होती, काही कागदपत्रात त्यांचे नाव अहल्या असे ही आहे, 

भारताच्या उत्तरेतील साम्राज्य विस्तार इंदूरच्या वीर मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मुळेच झालेला आहे, त्यांनी २८ वर्ष समर्थपणे राज्यकारभार करून राज्य विस्तार केला आहे, 

, त्यामुळे इंग्रजी लेखक लाॅटेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली, त्या तत्त्वज्ञानी व न्यायदानासाठी  प्रसिद्ध होत्या, इंदौर मध्ये त्यांच्या नावाने जनतेची सेवा करणा-या कर्तृत्ववान व्यक्तीस पुरस्कार दिला जातो,पहिला पुरस्कार मा, नानाजी देशमुख यांना मिळाला आहे इंदूरच्या विद्यापीठाला त्यांचे नाव दिले आहे, तसेच, महाराष्ट्र सरकारने ही  सोलापूर येथील विद्यापीठाला  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे, आज २९६ वर्ष पूर्ण होऊन ही त्यांच्या कार्यामुळे त्या  अमर आहेत,  अहिल्याबाई होळकर यांचे अंत:करण गंगाजला हुनही निर्मळ होते, सर्व रयत त्यांना मुला समान  वाटत होती, 

भारताच्या गौरवशाली इतिहासाचे एक सोनेरी पान संपणार होते, तो दिवस उजाडला १३ ऑगस्ट १७९५ रोजी रयतेला दु:खाच्या प्रचंड महासागरात सोडून त्या अनंतात विलीन झाल्या, तरीही आज आपल्या सर्वांना प्रेरणास्थान म्हणून इतिहासात त्या  अजरामर झाल्या आहेत, 

आजच्या तरुणांनी त्यांच्या काळातील ऐतिहासिक घाट, मंदिरे, छत्र्या, मठ, धर्मशाळा या वास्तुचे जतन करावे, त्यांची विचारसरणी अंमलात आणावी, 

 आजच्या सामाजाला त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे, आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन,

  साहित्यिक

प्रा, बरसमवाड विठ्ठल गणपत

    अहमदनगर,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News