21 मे रोजी आयएनएस राजपूत या जहाजास नौदलाच्या सेवेतून निवृत्त केले जाणार


21 मे रोजी आयएनएस राजपूत या जहाजास नौदलाच्या सेवेतून निवृत्त केले जाणार

भारतीय नौदलाची पहिली विनाशिका - आयएनएस राजपूत येत्या 21 मे रोजी नौदलाच्या सेवेतून निवृत्त केली जाणार असल्यामुळे एका गौरवशाली पर्वाची सांगता होणार आहे. रशियात (तत्कालीन सोविएत महासंघ) तयार झालेल्या काशीन श्रेणीच्या विनाशक जहाजांपैकी आघाडीवर असणारे आयएनएस राजपूत 04 मे 1980 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाले होते. गेल्या 41 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या जहाजाने भारतीय नौदलात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. आता विशाखापट्टणम येथील नौदलाच्या गोदीत एका खास सोहळ्यात या जहाजाला नौदलाकडून निरोप दिला जाईल. कोविड साथीमुळे  सर्व कोविड नियमांचे काटेकोर पालन करून हा समारंभ साधेपणाने आयोजित केला जात आहे.

आजच्या युक्रेनमधील निकोलाएव्ह येथील 61 कम्यूनर्ड्स जहाजबांधणी गोदीमध्ये आयएनएस राजपूतची निर्मिती झाली होती. या जहाजाचे मूळ रशियन नाव नादेज्नी असे असून त्याचा अर्थ आशा असा होतो. आपल्या देशाच्या चार दशकांच्या सेवाकाळात या जहाजाने पूर्व आणि पाश्चिम  अशा दोन्ही कमांडमध्ये   स्पृहणीय कामगिरी बजावली आहे.

राज करेगा राजपूत (राजपूत राज्य करेल) या ब्रीदवाक्यासह आयएनएस राजपूतने अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. यामध्ये श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील सागरी भागात भारतीय शांतिसेनेला मदत करण्यासाठी केलेले ऑपरेशन अमन मालदीव किनाऱ्याजवळ ओलीस धरलेल्यांच्या सुटकेसाठी केलेले ऑपरेशन कॅक्टस आणि लक्षद्वीपजवळील समुद्री भागात केलेले ऑपरेशन क्रोजनेस्ट या मोहिमांचा समावेश आहे. त्याखेरीज, अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय युद्धसरावांमध्ये या जहाजाने भाग घेतला. भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटशी हे जहाज संलग्न होते व अशाप्रकारे संलग्न होणारे ते भारतीय नौदलाचे पहिलेच जहाज होते.

या जहाजाच्या 41 वर्षांच्या गौरवशाली सेवेमध्ये, 14 ऑगस्ट 2019 ला रुजू झालेल्या शेवटच्या कमांडिंग अधिकाऱ्यासह 31 कमांडिंग अधिकाऱ्यांनी जहाजाची धुरा सांभाळली. 21 मे 2021 च्या सूर्यास्ताबरोबर आयएनएस राजपूतवरील नेव्हल एन्साईन (नौदलाचा ध्वज) आणि कमिशनिंग पेनंट (सेवारत असल्याचे सूचित करणारी ध्वजा) हे दोन्ही शेवटचे उतरविले जातील. अर्थात, आयएनएस  राजपूत भारतीय नौदलाच्या सेवेतून निवृत्त होईल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News