पाटस येथे भीषण अपघात ! एक ठार; तीन गंभीर


पाटस येथे भीषण अपघात ! एक ठार; तीन गंभीर

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:

पाटस : पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस येथे टोल नाक्यानजीक बुधवार (दि.१९) रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

      अपघातस्थळी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील एमक्युअर कंपनीची बस (एमएच 14 जीयू 1715) कामगारांना पुणे दिशेने घेऊन जात असताना पाटस टोल नाक्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर हॉटेल शिवनेरी नजीक केळीची वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पो चालकाशी (एमएच 13 आर 7497) बस चालकाची बाचाबाची झाली.

      या दरम्यान, कुरकुंभ घाटातून वेगाने आलेल्या ट्रकने (एमएच 12 एमव्ही 5597) बस व टेम्पोला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोराची होती की टेम्पो व बसचे अतोनात नुकसान होऊन टेम्पो महामार्गावरून खाली उतरून सर्व्हिस रस्त्यावर फेकला गेला. बसमधील कामगार योगेश भास्कर मुसमाळे (वय 40, रा. पुणे) याचा बसमधून खाली पडून डोक्याला मार बसल्याने जागीच मृत्यू झाला तर ओमप्रकाश यादव (वय 55, रा. हडपसर), हिमेश चव्हाण (वय 45, रा. पुणे), मनोहर बंडगर (वय 42, रा. दौंड) हे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

     घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, हनुमंत खडके, दशरथ कोळेकर, वाहतूक पोलीस व पाटस टोल नाक्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस प्रशासनाने तत्परतेने घटनास्थळावरील मृतदेह व इतस्ततः पसरलेली केळी व काचांचा खच हलवून महामार्ग खुला केला. अपघाताची घटना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम उशीर पर्यंत सुरू होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News