जागतिक पुस्तक दिनानिमित्त धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट


जागतिक पुस्तक दिनानिमित्त  धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट

माहिती अनुभव, ज्ञान व शहाणपण पुस्तकंच देतात -सुरेश खामकर

वाचन संस्कृती रुजवण्यासाठी टाळेबंदीत गावातील युवकांना घरातच वाचणासाठी पुस्तके उपलब्ध 

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास हरियाली संस्था व गोरे डेंटल क्लिनिकच्या वतीने पुस्तकांची भेट देऊन जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्याकडे हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी दोनशे तर डॉ. सुदर्शन गोरे यांनी शंभर पुस्तकांची भेट सुपुर्द केली.

सुरेश खामकर म्हणाले की, माहिती अनुभव, ज्ञान व शहाणपण पुस्तकंच देतात. पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास होतो. युवा वर्ग मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. मोबाईलमध्ये अनेक अ‍ॅप व गेम उपलब्ध झाल्याने नवीन पिढीने पुस्तकांकडे पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती पुन्हा बहरण्यासाठी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.   डॉ. सुदर्शन गोरे यांनी सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे. वाचन हा एक संवाद आहे. पुस्तकाचे वाचन केल्यास शब्दांच्या उच्चाराला धार येऊन उत्तम वक्तृत्व कौशल्य निर्माण होते. तर शब्दसंग्रह व ज्ञानात भर पडते. पुस्तक हे एक मार्गदर्शक असून, अनेक महान व्यक्तीमत्व पुस्तक वाचनातून प्रेरणा घेऊन घडले आहेत. वाचलेलं मनात पेरले जाते आणि माणुस इतरांच्या अनुभवातून शहाणा बनत असल्याचे स्पष्ट केले. वाचनालयाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी मेंदूला चालना पुस्तक वाचणाने मिळत असते. 23 एप्रिल हा जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअर यांची जयंती व पुण्यतिथी दिन असून, तो जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करण्यासाठी वाचनालय सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हरियाली संस्था व गोरे डेंटल क्लिनिकच्या वतीने देण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आत्मचरित्र, ऐतिहासिक, कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

 टाळेबंदीत धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा आगळा-वेगळा उपक्रम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीत वाचनालय बंद आहेत. मात्र युवक-युवती व ग्रामस्थांना घरी पुस्तक वाचनासाठी देण्यात आले आहेत. यामुळे घरी बसून चांगली पुस्तकेवाचता येणार आहे. तर युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचनसंस्कृतीस चालना मिळणार असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News