"कोरोना लसीकरण आपल्या दारी" हे राष्ट्रीय स्तरावर अभियान राबवा.....डॉ. कैलास कदम


"कोरोना लसीकरण आपल्या दारी" हे राष्ट्रीय स्तरावर अभियान राबवा.....डॉ. कैलास कदम

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: पिंपरी -  कोरोना कोविड -19 च्या लसीकरणामध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार राहूल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण लवकरात लवकर व्हावे हे देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. अठरा वर्षापुढील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी ‘कोरोना लसीकरण आपल्या दारी’ हे अभियान राष्ट्रीय पातळीवर राबवावे अशी मागणी ‘इंटक’चे पुणे जिल्हाध्यक्ष व पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ‘ई मेलव्दारे’ केली आहे.

     डॉ. कदम यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, ज्याप्रमाणे इस्त्राईल सारख्या छोट्या देशाने युध्द पातळीवर लसीकरण मोहिम राबवून कोरोनामुक्त आणि मास्कमुक्त देश म्हणून स्वत:ला घोषित केले. तसेच मॉडेल भारतात राबविले तर कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यात आणि कोरोनाला भारतातून हद्दपार करण्यास यश मिळू शकते. यासाठी देशभरातील सर्व सरकारी निमसरकारी, विविध महामंडळे आणि केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत उपक्रमांतील कर्मचारी, सर्व शाळा, महाविद्यालय यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राखीव पोलिस दल, केंद्रिय राखीव पोलीस दल, एनसीसी कॅडेट, होमगार्ड आणि इतर सामाजिक सेवाभावी संस्थांचे सभासद यांना प्रशिक्षण देऊन ‘कोरोना लसीकरण आपल्या दारी’ या उपक्रमात सहभागी करुन घेता येईल. ज्या प्रमाणे पोलिओ निर्मुलनासाठी रोटरी, लायन्स सारख्या संस्थांची मदत घेतली जाते. त्याप्रमाणे या अभियानात सामाजिक संस्थांची मदत घेता येईल. तसेच निवडणूक आयोग ज्याप्रमाणे नियोजनबध्द पध्दतीने निवडणूकीत मतदानाच्या दिवशी शाळा महाविद्यालयांमधून मतदान प्रक्रिया पुर्ण करते. त्या प्रमाणेच नियोजन केले तर अवघ्या काही आठवड्यात देशभरात ‘कोरोना लसीकरण आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी होऊ शकते. देशात सिरम इन्स्टिट्युटच्या लशींचे उत्पादन मुबलक प्रमाणात होत आहे. त्यातच पुढील आठवड्यात इतर देशातील लस देखिल भारतात वितरण होण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्रात आणि इतर राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने हाहाकार उडवला आहे. तिसरी लाट येण्याच्या अगोदर लसीकरण मोहिम वेगाने शहरी भागांसह गाव खेड्यात, दुर्गम भागात होणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करु शकू अशी आशा आहे, असेही पत्रात डॉ. कैलास कदम यांनी म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News