कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, मनुष्यबळ, औषधे, रूग्णालयातील खाटा या सर्वांच्या उपलब्धतेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आढावा


कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, मनुष्यबळ, औषधे, रूग्णालयातील खाटा या सर्वांच्या उपलब्धतेचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आढावा

कोविड विरुद्धच्या लढ्यात,केंद्र सरकारच्या श्रेणीबद्ध,आक्रमक उपाययोजना आणि सक्रीय दृष्टीकोनाला अनुसरून,केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, कोविड प्रतिबंधन,प्रतिबंधक क्षेत्रे आणि व्यवस्थापन याविषयीच्या कामांचा आढावा घेतला. तीन तासांपेक्षा अधिक काल चाललेल्या या बैठकीत, महाराष्ट्र, छत्तिसगढ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.बैठकीच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड रुग्णसंख्येत होत असलेल्या अभूतपूर्व वाढीविषयीचे सादरीकरण केले. 12 एप्रिल 2021 रोजी भारतात, एका दिवसांत सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली. ही रुग्णसंख्या एका दिवसातली जगातली सर्वाधिक संख्या होती, असेही यावेळी सांगण्यात आली. 12 एप्रिल ला जगभरात आढळलेल्या कोविड रूग्णांमध्ये, भारतातील 22.8% रुग्ण होते, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. “नव्या कोविड रूग्णांमध्ये भारतात सध्या 7.6% इतकी तीव्र वाढ नोंदली जात आहे, जून 2020 मध्ये हा रुग्णवाढीचा दर 5.5% टक्के होता, त्या तुलनेत सध्याचा  दर 1.3 पट अधिक आहे, दररोज बरे होणारे रुग्ण आणि दररोज संक्रमित झालेल्यांच्या संख्येतील तफावत, हे संक्रमण अत्यंत वेगाने पसरत असल्याचेच, तसेच, सक्रीय रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेच निदर्शक आहे,” असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. या सर्व 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या दररोजच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची क्षमता आधीच ओलांडली असून काही जिल्हे, जसे मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, लखनौ, रायपूर, अहमदाबाद आणि औरंगाबाद मध्येही हीच स्थिती उद्भवली आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये त्या तुलनेत करण्यात आलेल्या वाढीविषयीही त्यांनी माहिती दिली. कोविड रूग्णांवर त्यांच्या आरोग्याच्या गांभीर्यानुसार, उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या त्रिस्तरीय आरोग्य सुविधांअंतर्गत, 2084 समर्पित कोविड रुग्णालये (यापैकी 89 केंद्राकडे तर उर्वरित 1995 राज्यांकडे आहेत), 4043 समर्पित कोविड आरोग्य केंद्रे आणि 12,673 कोविड शुश्रुषा केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांमध्ये एकूण 18,52,265 खाटा आहेत. त्यापैकी 4,68,974  खाटा समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये आहेत. यावेळी, राज्यांना नव्या जीवनरक्षक प्रणालींचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन डॉ हर्ष वर्धन यांनी दिले. 1121 व्हेंटीलेटर्स महाराष्ट्राला, 1700 उत्तरप्रदेशाला, 1500 झारखंडला, 1600 गुजरातला, 152 मध्यप्रदेशला आणि 230 छत्तिसगढ या राज्यांना दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003BWB1.jpg

लोकसंख्येच्या निश्चित वगर्वारीनुसार, लसीकरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचवेळी लसींच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. सध्या राज्यांकडे मिळून सुमारे 1 कोटी 58 लाख लसींच्या मात्रा शिल्लक आहेत. तर आणखी 1 कोटी 16 लाख 84 हजार मात्रा वितरणाच्या प्रक्रियेत  असून त्या पुढच्या आठवड्यात वितरीत केल्या जातील. देशात लसींचा तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याची गरज आहे.

यावेळी NCDC चे संचालक डॉ एस के सिंग यांनी या सर्व राज्यांतील परिस्थितीचे विश्लेषण सादर केले.

यावेळी राज्य आरोग्य मंत्र्यांनी कोविड प्रतिबंधतात्मक क्षेत्रे, सर्वेक्षण आणि उपचार या मार्गांनी सुरु असलेल्या कोविड विषयक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, राज्यांकडून सुरु असलेल्या इतर उपाययोजनाही सांगितल्या. जवळपास सर्वच राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनी या बैठकीत, ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा, रुग्णालयांमध्ये रेमडेसीवीर औषधांचा पुरवठा वाढवणे, व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवणे, लसींचा पुरवठा वाढवणे अशा मागण्या केल्या. त्याशिवाय महाराष्ट्रात आढळत असलेला कोरोना विषाणूचा  डबल म्युटेंट स्ट्रेन यावर या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

राज्यांना या कोविडकाळात त्यांच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत मिळालेल्या वार्षिक निधीपैकी 50 टक्के निधी वापरण्याची परवानगी देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही, राष्ट्रीय आरोग्य मिशनचा, एक एप्रिल 2021 पर्यंत न वापरलेला निधी कोविड व्यवस्थापनासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे, याचा पुनरुच्चार या बैठ्कीत करण्यात आला.

गेल्या फेब्रुवारीपासून कोविड रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून अनेक राज्यांनी आता आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येची मर्यादा ओलांडली असल्याचे लक्षात घेत, डॉ हर्ष वर्धन यांनी सर्व राज्यांना, आगावू नियोजन करण्याच्या तसेच कोविड रुग्णालये, ऑक्सिजनयुक्त खाटा आणि इतर आवश्यक आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील आरोग्य मंत्री , या बैठकीला उपस्थित होते. त्याशिवाय आरोग्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, आणि आरोग्य विभागांचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News