महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून गरजूंची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया...फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम


महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून  गरजूंची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया...फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने फिनिक्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी -डॉ. कोठुळे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शनिवार व रविवारी संचारबंदी असल्याने शुक्रवार दि.9 एप्रिल रोजी नागरदेवळे (ता.नगर) येथे झालेल्या या शिबीरात कोरोना प्रतिबंधात्मकतेचे सर्व नियम पाळून रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तर काही ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

शिबीराचे उद्घाटन क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी नागरदेवळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. भारतकुमार कोठुळे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ.विशाल घंगाळे, डॉ. कळमकर, सुशील गाडेकर, किरण कवडे, मिश्रीलाले पटवा, आर्यन कराळे, साई धाडगे आदी उपस्थित होते.  प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे म्हणाले की, सामाजिक परिवर्तनाची नांदी क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेबांच्या कार्याने घडली. दोन्ही महापुरुषांनी शिक्षणाचा कानमंत्र देऊन समाजाच्या उध्दारासाठी सर्वस्वी पणाला लावले. अशा महापुरुषांचे विचार प्रेरणादायी असून, कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना आधार देण्यासाठी त्यांच्या विचाराने फिनिक्स फाऊंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

आरोग्य अधिकारी डॉ. भारतकुमार कोठुळे म्हणाले की, सामाजिक सेवेचा वसा घ्यावा लागतो. दोन, तीन सामाजिक उपक्रम घेवून समाजसेवक होता येत नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारानेच फिनिक्स फाऊंडेशनचे सामाजिक कार्य चालू आहे. जालिंदर बोरुडे यांनी शासकीय नोकरी सांभाळताना समाजसेवेचा घेतलेला वसा निस्वार्थ भावनेने पार पाडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात फिनिक्स फाऊंडेशन करीत असलेल्या रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गौरव बोरुडे यांनी केले. आभार सौरभ बोरुडे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनचे पदाधिकारी व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News