मराठवाड्यात ४० गुन्हे दाखल असणारे आणि जिल्ह्यात रस्त्यात लुटमार करणारे कुविख्यात सराईत सैराट गुन्हेगारासह दोघे लातूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची धाडसी कारवाई


मराठवाड्यात  ४० गुन्हे दाखल असणारे आणि जिल्ह्यात रस्त्यात  लुटमार करणारे कुविख्यात सराईत सैराट गुन्हेगारासह दोघे लातूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची धाडसी कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : पुणे जिल्हयात रोड रॉबरी करणाऱ्या व मराठवाड्यात तब्बल ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात सराईत गुन्हेगारासह दोघे लातूर येथून जेरबंद करून २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

      दि.२७ मार्च २०२१ रोजी फिर्यादी हेमंत करे रा.पंढरपूर जि.सोलापूर व त्याचा मित्र असे दोघेजण स्प्लेंडर मोटरसायकलवर पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुणे असे जात असताना रात्री ०२.०० वा. चे सुमारास रावणगाव ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत शिवआई मदिराजवळ आले असता दोन अज्ञात इसमांनी सोलापूर रोडने पाठीमागून येवून त्यांचे स्प्लेंडरला  बुलेट मोटरसायकल आडवी मारुन फिर्यादीचे स्प्लेंडरची चावी जबरदस्तीने काढून घेवून फिर्यादी व त्याचे मित्राचा मोबाइल, कागदपत्र असलेली बॅग, रोख १,८००/- असा एकूण ६७,८००/-  रुपयाचा माल मारहाण करून जबरीने चोरुन अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. त्याबाबत फिर्यादीने दोन अनोळखी इसमांविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

      सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा.पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजपुरे यांनी तपास सुरू केला. गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने लागलीच लातूर येथे जावून अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराची माहिती घेऊन सापळा रचून आरोपी नामे १) ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव वय ३० वर्षे रा.रेणापूर, रुपचंदनगर तांडा, ता.रेणापूर जि.लातूर  २) अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव वय १९ वर्षे रा.औसा हनुमान, खंडोबा गल्ली, लातूर जि.लातूर या दोघांना लातूर येथून ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सैराट जाधव याचेकडे एक लाल रंगाची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल व आरोपी अर्जुन उर्फ अजय जाधव याचेकडे एक स्लेंडर प्लस मोटरसायकल अशा दोन मोटरसायकली मिळून आल्या. त्यांचेकडे मिळालेल्या दोन्ही मोटरसायकलची पोलीसी खाक्यात त्यांच्याकडे चौकशी केली असता, बुलेट मोटरसायकल ही दोघांनी मिळून थेऊरफाटा ता.हवेली जि.पुणे येथून चोरल्याचे व स्लेंडर प्लस मोटरसायकल ही रावणगाव पुणे-सोलापूर रोड येथे दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील बॅगा, पैशासह मोटरसायकल जबरदस्तीने पळवून आणल्याचे सांगितले आहे. सदर आरोपींकडून दौंड पोलीस स्टेशन कडील जबरी चोरीचा व लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील बुलेट चोरीचा असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

       *आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ सैराट जाधव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी लातूर, बिड, नांदेड, परभणी व पुणे जिल्हयात दुचाकी, चारचाकी वाहन चोरी, पोलीस पेहराव करून किंवा पोलीस, आर्मी सैनिक असल्याची बतावणी करून लोकांना लुटणे, कस्टडीत असताना कारवाई टाळणेसाठी स्वतःचे अंगावर वार करणे  आत्महत्येचा प्रयत्न, वेळप्रसंगी पोलीसावरही हल्ल्याचा प्रयत्न तसेच दोन वेळा कस्टडीतून  पळून जाणे व जबरी चोरी असे विविध प्रकारचे एकूण ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.*

       आरोपींनी पुणे जिल्ह्यात सोलापूर रोड परिसरात अशाप्रकारे बऱ्याच लोकांची लुटमार केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू असून आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कोणाची जबरदस्तीने लूटमार झाली असल्यास दौंड पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केले आहे. दोघे आरोपीस पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास दौंड पोलीस  स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

       सदरची कामगिरी ही मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,  बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा.पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजपुरे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News