विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
पिंगोरी ता.पुरंधर जि.पुणे येथील वाघेश्वरी मंदिर चोरीतील सहा वर्षापासून फरार असलेल्या अट्टल सराईतास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक ५ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ०५.०० ते ०६.४५ वा. चे दरम्यान पिंगोरी ता.पुरंधर जि.पुणे येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी वाघेश्वरी देवीचे मंदिराचे दरवाजाचे ग्रीलची लोखंडी साखळी तोडून देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचांदीचे दागिने असा किं.रू.९६,०००/- चा ऐवज चोरून धार्मिक भावना दुखावल्या. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून जेजुरी पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयात अमृत पांडूरंग नानावत वय २५ रा.नांदूर ता.दौंड जि.पुणे यास दि.१६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आलेली होती. त्याचा साथीदार पोपी लुमसिंग उर्फ दिपक कचरावत उर्फ राठोड रा.जेजूरी हा निष्पन्न झालेला होता परंतु तो फरारी झालेला होता. तो वारंवार राहण्याचा पत्ता बदलत असल्याने पोलिसांना शोध घेवूनही मिळून येत नव्हता. त्यामुळे मे. कोर्टाने त्याचेवर पकड वारंट जारी केले होते.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथकास दिनांक २४ मार्च २०२१ रोजी जेजुरी पोलीस स्टेशन दाखल असलेल्या पिंगोरी येथील मंदिर चोरीचे गुन्हयातील सहा वर्षापासून फरारी असलेला आरोपी नामे पोपी लुमसिंग उर्फ दिपक कचरावत उर्फ राठोड वय ३२ वर्षे रा.जेजूरी, आनंदनगर ता.पुरंदर जि.पुणे हा कुरकुंभ ता.दौंड येथे येणार असल्याची बातमी मिळाली . त्यावरून सदर पथकाने वेशांतर करून त्या ठिकाणी सापळा रचून पोलीसांना पाहून पोपी राठोड हा पळून जात असताना पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे.
सदर आरोपी पोपी राठोड याचेवर यापूर्वी पुणे शहर व जिल्हयात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न व इतर असे एकूण ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीने आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्यास जेजुरी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत.