भारतीय रेल्वेने दररोज 23 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी 20 % म्हणजेच 4.6 दशलक्ष महिला प्रवासी असतात. अलीकडच्या काही काळात रेल्वे आणि रेल्वे स्थानक परिसरात महिलांबाबत होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणूनच, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्वाची पावले उचलली आहेत.
कार्य योजना :
या साठीची कार्ययोजना तत्कालिक आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन भागात विभाजित करण्यात आली आहे. तत्कालिक योजनेची अंमलबजावणी तत्काळ, विनाविलंब उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून प्राधान्याने सुरु केली जाणे अपेक्षित आहे. यात, संशयितांवर नजर ठेवणे, सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी धोकादायक जागांवर वारंवार जाऊन पाहणी करणे, इत्यादी उपाययोजना असु शकतील. मात्र, दीर्घकालीन कार्ययोजनेत, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सीसीटीव्ही, अंधाऱ्या जागी सार्वजनिक दिवे लावणे इत्यादी उपाय करता येतील. यासाठी वेळ लागू शकेल. मात्र, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा नियमित पाठपुरावा करुन या उपाययोजना करून घ्याव्यात. आणि त्या पूर्ण होईपर्यंत, परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक बारीकसारीक सुधारणा करायला हव्यात. यातून हे गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकेल. सध्या असलेल्या संसाधनांच्या मदतीने, कमी खर्चात या सुधारणा करायला हव्या आहेत.