श्रीकांत मोघे म्हणजे उमदं, निगर्वी, चिरतरूण व्यक्तिमत्त्व आशा काळे यांनी उलगडला आठवणींचा पट : संवाद पुणे, क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली


श्रीकांत मोघे म्हणजे उमदं, निगर्वी, चिरतरूण व्यक्तिमत्त्व  आशा काळे यांनी उलगडला आठवणींचा पट : संवाद पुणे, क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली

पुणे प्रतिनिधी सागरराज बोदगिरे : 

श्रीकांत मोघे म्हणजे उमदं, निगर्वी, चिरतरूण व्यक्तिमत्त्व; जातीवंत कलावंत. उत्तम, स्वच्छ मराठी बोलणे, स्वभावात गोडवा होता. ऐतिहासिक नाटकात भूमिका करताना त्यांचा रंगभूमीवरील वावर चित्त्यासारखा असायचा अशा आठवणींना वाट करून दिली ती मोघे यांच्याबरोबर अनेक भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी!

संवाद पुणे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने ज्येष्ठ दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (दि. 15 मार्च) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काळे यांनी आठवणींचा पट उपस्थितांसमोर उलगडला. अभिनेते शंतनू मोघे, अभिनेत्री प्रिया मराठे तसेच महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदिप खर्डेकर, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ या वेळी उपस्थित होते.

आशा काळे यांनी त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करताना श्रीकांत मोघे यांची झालेली ओळख, ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाच्या तालमींचे प्रसंग, भारदस्त आवाज आणि संवादांमुळे मोघे यांना रसिकांच्या मिळणार्‍या टाळ्या असे विविध किस्से सांगितले. श्रीकांत मोघे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक होते. श्रीकांत मोघे आपल्यातून गेलेले नाहीत तर त्यांच्या भूमिकांमधून ते आपल्यात चिरंतन आहेत, असेही त्या म्हणाल्या.

नट, पिता म्हणून ते आमचे विद्यापीठ होते, असे सांगून अभिनेते शंतनू मोघे म्हणाले, जग किती सुंदर आहे हे त्यांच्या बोलण्यातून-वागण्यातून पदोपदी दिसायचे. जीवनात आलेल्या संकटांना हसत-हसत सामोरे जा अशी त्यांची शिकवण असायची. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो अशी भावना त्यांच्या मनात सदोदित असायची. माणूस म्हणून ते आवडायचेच पण नट म्हणून ते अफलातून होते. रूप उत्तम होते, नृत्य-गायनाचे अंग होते. त्यांचे कुणाशी वैर नव्हते. प्रचंड बॅलन्सड् माणूस. त्यांनी जगण्याची उर्जा दिली, आयुष्याच्या वाटचालीसाठी विचार दिला.

प्रिया मराठे म्हणाल्या, ते बाबापेक्षाही जवळचे असे होते. वेगवेगळ्या नावाने हाका मारायचे, मुलीसारखेच प्रेम त्यांनी माझ्यावर केले. ते नाटकांविषयी, नाट्यप्रयोगांविषयी कायम चर्चा करायचे. घरात येणार्‍या प्रत्येकाचे ते हसतमुखाने स्वागत करायचे. त्यांचा स्वभाव पारदर्शी, नितळ होता.

मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, सुरुवातीला कलाकार आणि प्रेक्षक असेच आमचे नाते होते. ते दिसले तरी खूप छान वाटायचे. परंतु त्यांची जेव्हा ओळख झाली, ते आमच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होऊ लागले तेव्हा त्यांचा सहवास उत्साहपूर्ण वाटायचा. 

परमेश्वरी कृपेला पात्र असणारा माणूस अशा शब्दात रवींद्र खरे यांनी भावना व्यक्त केल्या. उत्स्फूर्तपणे दाद देणारा त्यांच्या सारखा दुसरा  कलाकार मिळणार नाही.

चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, संजय ठुबे, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट, विजय कोटस्थाने यांनीही मोघे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी अनेक आठवणी, भेटी दरम्यानचे किस्से सांगत वडिलधारी व्यक्ती गेल्याचे दु:ख असल्याचे सांगितले. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदिप खर्डेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.

फोटो ओळ : संवाद पुणे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने ज्येष्ठ दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (दि. 15 मार्च) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित (डावीकडून) प्रिया मराठे, निकिता मोघे, शंतनू मोघे, मंजुश्री खर्डेकर, आशा काळे, सुनील महाजन.

संवाद पुणे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने ज्येष्ठ दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (दि. 15 मार्च) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित (डावीकडून) निकिता मोघे, मंजुश्री खर्डेकर, आशा काळे, सुनील महाजन, शंतनू मोघे, प्रिया मराठे, संदीप खर्डेकर.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News