निवारा व रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी झावळी उद्योग ग्रामचे प्रस्ताव पूजन


निवारा व रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी झावळी उद्योग ग्रामचे प्रस्ताव पूजन

महामार्गालगत असलेल्या खडकाळ पड जमिनीवर उद्योगधंद्यांचा विकास साधण्यासाठी

लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना स्विकारण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - महामार्गालगत असलेल्या खडकाळ पड जमिनीचा वापर करुन घरकुल वंचितांचा निवारा व बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झावळी उद्योग ग्रामचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर हा प्रस्ताव कार्यान्वीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, अंबिका जाधव, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, गिता डहाळे, दिनेश वाजे, किशोर शेरकर, सखुबाई बोरगे, फरिदा शेख, पोपट भोसले, सोमनाथ अडागळे, रवी साळवे आदिंसह महिला सहभागी झाल्या होत्या. उपस्थित शाहिरांनी पारंपारिक वाद्य वाजवून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन उपस्थितांनी झावळी उद्योग ग्रामचा प्रस्ताव ठेवला. कल्याण-अहमदनगर, पुणे-नाशिक, पुणे-अहमदनगर-औरंगाबाद, अहमदनगर-शिर्डी या सर्व महामार्गाच्या दुतर्फा माळरानाच्या पड जमिनीवर झावळी उद्योग ग्राम उभे करून आत्मनिर्भर रोजगार आणि निवाराचा प्रश्‍न सोडविण्याची घोषणा देण्यात आली. तर झावळी उद्योग ग्राम निर्मितीसाठी प्रत्येक उद्योजकाला सौर उद्योग तळ्याची निर्मिती करण्यासाठी संघटनेने आग्रह धरला. 

इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये स्वयंरोजगार आणि निवार्‍याचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. शिक्षणाचा प्रचार प्रसाराबरोबर देशात बेरोजगारी देखील वाढत आहे. गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकीमध्ये मतांची झोळी भरण्यासाठी देण्यात आला. परंतु प्रत्यक्षात या देशात गरिबी हटवणे ऐवजी प्रत्येक शहरात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेचा स्विकार करुन निवारा आणि स्वयंरोजगारासाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.नारळाच्या प्रत्येक फांदीला झावळी म्हटले जाते. नारळाचा अन्नरस झावळीच्या माध्यमातून एकत्रित केला जातो. त्याच प्रकारे महामार्गालगत असलेल्या खडकाळ पड जमिनीवर प्रत्येक बाजूला 5 कि.मी. पर्यंत दुतर्फा औद्योगिक रस्त्यांची निर्मिती झाली पाहिजे. अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उद्योग ग्रामची निर्मिती होऊ शकणार आहे. प्रत्येक लघु उद्योजकाला राहण्यासाठी एक गुंठा तर कारखान्यासाठी पाच गुंठे भूखंड स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा हा प्रस्ताव आहे. प्रत्येक उद्योजकाला एक गुंठा जमिनीमध्ये सौर उद्योग तळ्याची निर्मिती करता येऊ शकणार आहे. प्लास्टिकचा कागद वापर करुन शेततळे प्रमाणे पावसाळ्यात पाणी भरून ठेवायचे त्यावर दहा फूट उंचीवर सोलर ऊर्जेचा छोटा प्रकल्प राबवायचा. त्याशिवाय तळ्यात फ्लोटिंग स्विमिंग टँक उभे करता येणार आहे. तसेच त्यामध्ये मत्स्यपालन करून उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण करुन उत्पादन खर्चात बचतीद्वारे इतरांच्या रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्याची तरतुद झावळी उद्योग ग्रामच्या प्रस्तावात आहे.

अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी आज निवारा व स्वयंरोजगाराचे प्रश्‍न सोडविण्यास केंद्र सरकार व राज्य सरकार उदासीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांवर भूमिगत पाण्याच्या तळ्याची निर्मिती केली होती. त्याच प्रकारे उद्योजकांना उद्योग तळ्यांच्या माध्यमातून मदत केल्यास प्रत्येक उद्योगांमध्ये किमान शंभर ते दोनशे लघुउद्योजकांना कारखाने उभे करुन घरकुल वंचितांसाठी निवारा व बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविता येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News