अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे रोकोचा प्रयत्न..सदर रेल्वे सुरु करण्यास प्राधान्य देण्याचे रेल्वे विभागाच्या लेखी आश्‍वासनाने आंदोलन मागे


अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे रोकोचा प्रयत्न..सदर रेल्वे सुरु करण्यास प्राधान्य देण्याचे रेल्वे विभागाच्या लेखी आश्‍वासनाने आंदोलन मागे

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेसाठी राज्य सरकारकडे लागणारी परवानगीसाठी पाठपुरावा करु- आ.संग्राम जगताप

तीन महिन्यात रेल्वे सेवा कार्यान्वीत न झाल्यास पुन्हा रेल्वे रोको -हरजितसिंह वधवा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - जिल्ह्याच्या दृष्टीकोनाने जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना, विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांच्या फौजफाट्याने आंदोलकांना प्रवेशद्वारतच अडवले. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. यामध्ये हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अ‍ॅड. कारभारी गवळी, संजय सपकाळ, मन्सूर शेख, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, संभाजी पवार, बहिरनाथ वाकळे, अशोक कानडे, जालिंदर बोरुडे, सुहास मुळे, विपुल शहा, सुनिल छाजेड, संजय वाळुंज, संतोष बडे अ‍ॅड.सुभाष लांडे, अशोक सब्बन, सुनिल छाजेड, प्रकाश भंडारे, अभिजीत सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडवे, दिलीप ठोकळ, मलिक अर्जुन, प्रविण आरु, तेजस दारोकर, अजीमोद्दीन शेख, गनी शेख, सलिम सहारा, संदेश रपारिया, जस्मित वधवा, दत्ता खैरे, गोरख दळवी आदी सहभागी झाले होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे गरजेची गोष्ट बनली असून, हा संपुर्ण जिल्ह्याचा प्रश्‍न आहे. यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाचून शहराचा देखील विकास साधला जाणार आहे. नगरमधून पुण्याला जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. रस्त्याने जाताना मोठा वेळ व पैसा खर्च होऊन देखील अपघात होण्याचा धोका असतो. या रेल्वे सेवेमुळे काही वेळेतच पुण्याला सुरक्षितपणे जाता येणार आहे. या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नासाठी दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्री व रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेऊ. तरी देखील प्रश्‍न न सुटल्यास थेट दिल्लीला आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. हरजितसिंह वधवा यांनी मोठ्या संख्येने युवक शिक्षण व रोजगारासाठी पुण्याला जात आहे. रस्त्याने अपघात, प्रदुषण व वाहतुक कोंडी धोका भेडसावत असतो. ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना परवडणार असून, शहराचा देखील विकास होणार असल्याचे सांगितले. तर येत्या तीन महिन्यात ही रेल्वे सेवा सुरु न झाल्यास कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता रेल्वे रोको आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला. अर्शद शेख म्हणाले की, कॉडलाईन व विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले असताना देखील ही सेवा प्रलंबीत ठेवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा रखडली आहे. जनआंदोलनाच्या रेट्याने ही सेवा कार्यान्वीत करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी नगर शहर विकसीत होऊन ड्रिमसिटी होण्यासाठी अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा महत्त्वाची ठरणार आहे. इतर मोठ्या शहरात बुलेट ट्रेन सुरु करण्यापेक्षा नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याची गरज आहे. केंद्र सरकार व रेल्वे विभागाचा कारभार टंगळमंगळ व अनागोंदी असल्याचा त्यांनी आरोप केला. सुहास मुळे यांनी ही रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी विविध संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची भाषणे झाली.या आंदोलनाची दखल घेत अहमदनगर रेल्वे स्टेशनचे प्रभारी मॅनेजर श्रीकांत परेडा यांनी आंदोलकांना लेखी पत्र दिले. मात्र अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत ठोस आश्‍वासन नसल्याने ते पत्र न स्विकारता आंदोलन सुरु ठेवण्यात आले. वधवा यांनी सोलापूर व पुणे रेल्वे विभागात चर्चा झाली असून, रात्री वरिष्ठ वाणिज्य अधिकारी सोलापूर विभाग यांनी व्हॉट्सअपवर टाकलेल्या आश्‍वासनाचे लेखी पत्र देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रभारी मॅनेजर परेडा यांनी नगर पासून पुणे येथे शटल रेल्वे सेवा सुरु करण्यास प्राधान्य देत आहोत. कोरोनामुळे राज्य सरकारची सर्वांसाठी खुली परवानगी नसल्याने ही सेवा कार्यान्वीत करण्यास काही काळावधी देण्याची विनंती करुन आंदोलन स्थगित करण्याचे लेखी पत्रात स्पष्ट केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तर आमदार जगताप यांनी सदर रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी राज्य सरकारकडे लागणारी परवानगीसाठी पाठपुरावा करण्याचे यावेळी आश्‍वासन दिले. या आंदोलनात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हर दिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाउंडेशन, फिनिक्स फाउंडेशन, आडते बाजार व्यापारी असोसिएशन आस्या अनेक स्वयंसेवी, व्यापारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News