शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण
शेवगाव येथील आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते प्रा. किसन चव्हाण यांची वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
प्रा. किसन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राज्यभर कार्यरत आहेत. संघटन कौशल्य आणि कुठलाही प्रश्न धसास लावण्यासाठी रस्त्यावर उतरून, प्रसंगी शासन व प्रशासन यांना धारेवर धरून कोंडीत पकडणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि वंचित बहुजन आघाडीची मुलुख मैदानी तोफ अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्ववाद्वारे राज्यभर निर्माण केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा असणारे माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे अत्यंत निकटवर्तीय, विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर मराठवाड्याचे निरीक्षक, प्रदेश महासचिव, राज्य प्रवक्ते व आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक तसेच पार्लमेंटरी बोर्ड सदस्य म्हणूनही ते काम पाहतात.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शेवगाव पाथर्डी मतदार संघातून उमेदवारी केली होती. व पहिल्याच प्रयत्नात त्यांनी १० हजाराहून अधिक मते मिळवली. गाव, तालुका, जिल्हा, विभाग, व राज्य पातळीवर विविध प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने, धरणे, मोर्चे, रास्ता रोको अशी लोकशाही पद्धतीने आंदोलने केली आहेत.
त्यांचे आंदकोळ हे आत्मकथन देखील खुप गाजले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमुळे उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या या नवीन निवडीबद्दल ॲड. डॉ. अरुण जाधव, डॉ. जालिंदर घिगे, प्रा. स्वरूपचंद गायकवाड, प्रकाश बापु भोसले, भगवान राऊत, प्रतिक बारसे, योगेश साठे, प्यारेलाल शेख, रविंद्र म्हस्के, अरविंद सोनटक्के, अतिष पारवे, सोमनाथ भैलुमे यांनी अभिनंदन केले आहे.