मोबाईलच्या दुनियेत पत्र लेखन हरविल्याची खंत - अरविंद जगताप


मोबाईलच्या दुनियेत पत्र लेखन हरविल्याची खंत - अरविंद जगताप

भिगवण(प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 
आजच्या तरुण वर्गातील विचित्र मानसिकतेमुळे मोबाईलच्या दुनियेत एकमेकांना प्रेमाचा, स्नेहाचा, जिव्हाळ्याचा तसेच सुख-दुःखाचा संदेश देणारे पत्र हरवले असल्याची खंत  चित्रपट कथा लेखक तसेच चला हवा येऊ द्या मालिकेतील पत्र लेखन करणारे अरविंद जगताप यांनी व्यक्त केली.
 भिगवण येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित विसाव्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उदघाटन प्रसंगी प्रथम पुष्प गुंफताना "पत्रास कारण की....!" या विषयावर ते बोलत होते.  व्याख्यानमालेचे उदघाटक म्हणून श्री विठ्ठल एज्युकेशन एन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर चे संस्थापक सचिव प्राचार्य बी. पी. रोंगे, अध्यक्ष म्हणून भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे तर प्रमुख अतिथी म्हणून महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र कोंढरे हे यावेळी उपस्थित होते. प्रायोजक प्रतिनिधी म्हणून श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन पराग जाधव, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व चौधरी स्टील फर्निचर चे संचालक संजय चौधरी हे उपस्थित होते.
       जगताप पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळात पत्राला फार महत्व होते.छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशासारख्या थोर पुरुष, संत-महंतांनी त्याकाळी लिहिलेली पत्रे ही त्यांच्या कार्याची निशाणी होती. ती पत्रे आजही प्रेरणादायी ठरत आहेत. आई-वडील, काका-मामा, भाऊ-बहीण यांनी पाठविलेल्या आंतरदेशीय पत्रात लिहिलेला मजकूर किंवा त्यातून पाठविलेली एखादी वस्तू म्हणजे प्रेमाची, स्नेहाची द्योतक होती.  आज मात्र इंटरनेट व मोबाईल च्या दुनियेत हे सर्व नामशेष झाले आहे. त्यामुळे माणसां-माणसातील  प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या बाबी संपुष्टात आल्या असून त्यामुळे नात्याची बंधने शिथिल होत आहेत. 
       दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर वंदेमातरम द्वारा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महासंघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मसकर यांनी प्रास्ताविक भाषण करून महासंघाच्या वीस वर्षातील कार्याचा आढावा घेतला. आर्मी मधील असि. कमांडर पदाकरिता घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राजेगाव ता. दौंड येथील  भूषण भरत जाधव याचा यावेळी सन्मान करण्यात आला. जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश ढवळे, बिराज माने, कार्यकारी सदस्य भारत मोरे, एड. दिलीप गिरंजे, शरद जगदाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्र संचलन महासंघाचे प्रमुख सल्लागार डॉ. जे. आर. खरड, परिचय वाचन डॉ. संकेत मोरे व वंदेमातरम संचलन भारत गायकवाड यांनी केले. कोरोनाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत सदर व्याख्यानमाला घेण्यात येत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News