बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या परिसरातील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या खडीक्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी मोढवे ग्रामस्थांच्या वतीने बारामती प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. "खडीक्रशर बंद करा, मोढव्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या" अशी मागणी उपोषणकर्त्यांनी यावेळी केली आहे.
मोढवे परिसरातील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या खडीक्रशर बंद करण्यात याव्यात अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू करण्यात आले आहे. खडीक्रशरमुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे, शेतीचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मोढवे परिसरातील ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा फटका व त्रास सहन करावा लागत आहे. तेथील जमिनी खडी मशीनमध्ये होणाऱ्या धुळीमुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला असून पिकांवर सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे. तेथे होणाऱ्या स्फोटामुळे घरांना प्रचंड मोठे तडे गेले आहेत. शेतामध्ये काम करत असताना धुळीमुळे काम करणेही अवघड झाले आहे. तेथे सतत स्फोट घडवल्यामुळे त्या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
त्यामुळे आमच्या जमिनी खराब होते चालल्या आहेत आम्ही कसे जगायचे, आमचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आम्हाला या त्रासामुळे गाव सोडण्याची वेळ येऊ शकते अशी भीती मोढवे ग्रामस्थ व आसपासचे शेतकरी व्यक्त करीत आहेत आम्हाला न्याय मिळावा अशी विनवणी शेतकरी करत आहेत. यासंबंधी २४ डिसेंबर २०२० रोजी बारामती तहसीलदार यांना निवेदन दिले होते. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देखील त्यानंतर निवेदन दिले होते. मात्र दखल न घेतल्याने मंगळवार दि. २ फेब्रुवारी २१ रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मोढवे ग्रामस्थांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिकराव काळे, तानाजी कोळेकर, सरपंच वैभव मोरे, संग्राम मोरे, संपतराव टकले, गजानन कोळपे, दशरथ कोळपे, दादासो मोटे, धोंडीबा टेंगले आदींचा यामध्ये समावेश आहे.