श्रीगोंदा: प्रतिनिधी अंकुश
तुपे-नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगांव गावच्या शिवारात मंगळवार दि.(२६ जानेवारी) सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीस्वार व दिनेशचंद्र अग्रवाल कंपनीचा हायवा यांची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच मृत्यूमुखी पडले.
सिकंदरभाई पठाण वय (४५)रा.म्हातारपिंप्री,श्रीगोंदा असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नगर-दौंड मार्गावरून नगरहून दौंडच्या दिशेने जोरात दिनेशचंद्र अग्रवाल कंपनीचा हायवा निघाला होता.गाडी मढेवडगांव गावच्या शिवारात आली असता नगरच्या दिशेने एक हायवा जात होता.मढेवडगांव गावच्या शिवारात ही दोन्ही वाहने समोरासमोर त्यांची धडक झाली.धडक दिल्यानंतर हायवा चालक पळून गेला.अपघात इतका भीषण होता की त्या वेळी मोठा आवाज झाला. हायवाच्या धडकेने दुचाकीस्वार लांब उडून काही अंतर मागे पडला व जागीच मृत्यूमुखी पडला. अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ रोखली गेली होती. हेड कॉन्स्टेबल मनोहर किसन गावडे, पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला.पुढील तपास श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराम ढिकले करीत आहेत.
अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना नाही
नगर-दौंड रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. नगर पासून दौंड रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यात संबंधित ठेकेदाराने पूर्ण झालेल्या रस्त्यावर अपघात रोखण्यासंदर्भात कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. पूर्वी रस्ता खराब होता म्हणून या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले. रस्ता चांगला झाल्यानंतर तरी अपघात कमी होतील, अशी अपेक्षा असताना पुन्हा अपघात घडल्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.