श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा


श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा

एक नव्हे तर दोन्ही घरांचे जीवन उजळून टाकणारी स्त्रीच असते - डॉ. सुधा कांकरिया

     नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) एक नव्हे तर दोन्ही घरांचे जीवन उजळून टाकणारी बालिकाच असते. सासरी व माहेरी दोन्हीकडे ती आपल्या सद्गुणांनी, कर्तृत्वानी उजेडाची मानकरी ठरते. त्यामुळे स्त्री जन्माचे प्रत्येकाने स्वागत केले पाहिजे. स्त्री ही कोणत्याही बाबतीत कमी नसते. मुलगा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही घर उजळून टाकणारी पणती असते, असे प्रतिपादन  स्त्री जन्माचे स्वागत करा या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.

     राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी सौ.कांकरिया बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे होते.  यावेळी  सहसचिव राजेंद्र झालानी, विश्‍वस्त सौ.रश्मी येवलेकर, मुख्याध्यापिका सौ. कांचन गावडे, प्राथ.मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी उपस्थित होत्या. पुढे बोलतांना डॉ.सुधा कांकरिया म्हणाल्या की, आज स्त्री भ्रुण हत्येमुळे समाजाची घडी विस्कटली आहे. ती परत नीट बसविण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत झाले पाहिजे. आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यालयात स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हात उंच करून ठरावाला मान्यता दिली. तसेच फक्त कन्या असलेल्या परिवारांचाही सन्मान करण्यात आला. ही अभिनंदनीय बाब आहे. ज्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म होत नाही त्या कुटुंबातील आईला दोषी ठरवले जाते. तिच्यावर अन्याय, अत्याचार केला जातो ही बाब थांबविण्यासाठी गुणसुत्राचे विज्ञान प्रत्येक घरात समजावून सांगितले पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. दोघांचेही स्वागत करण्याची भूमिका असावी असे त्या म्हणाल्या.संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे म्हणाले की, मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुली कुठेही कमी नाहीत. उलट अधिक चिकाटीने, प्रामणिकपणे त्या कार्यरत असतात.  डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्रीजन्माचे स्वागत करा ही चळवळ अनेक वर्षांपासून सुरु आहे. अशा उपक्रमांत मुलींविषयी आदर निर्माण होऊन जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


     मुख्याध्यापिका सौ.कांचन गावडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन विद्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राजेंद्र झालानी, रश्मी येवलेकर, अरुणा वाघ आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

                              सुत्रसंचालन आशा वरखडे यांनी केले तर  आभार उज्वला सूर्यवंशी यांनी मानले. डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थितांना स्त्रीजन्माच्या स्वागताची शपथ दिली. फक्त कन्या असलेल्या सौ.उमादेवी राऊत, रिना अंधारे, मीना पांडूळे, अरुणा वाघ, अर्चना कदम, सुनिता झोडगे, आशा शिंदे आदि परिवारांचा यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News