फेरफार अदालतीचे 20 जानेवारीला आयोजन


फेरफार अदालतीचे 20 जानेवारीला आयोजन

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

          पुणे,  दि. 19 (जि.मा.का. ):  लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. ग्रामपंचायत निवडणूकांमुळे या महिन्यातील फेरफार अदालत तिस-या बुधवारी म्हणजेच दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (रजा राखीव) संजय तेली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

            जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रलंबित नोंदीबाबत विशेष मोहिम घेऊन मागील तीन महिन्यात 61 हजार नोंदी निर्गत केल्या आहेत. जिल्हयात सध्या 27 हजार नोंदी प्रलंबित असून  त्यापैकी 16 हजार  नोंदी नोटीस काढणे व  बजावण्यावर प्रलंबित आहेत. 11 हजार नोंदी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध असून यापैकी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत.

            फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी/तहसिलदार काही फेरफार अदालतीला उपस्थित राहणार आहेत. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र सादर करुन आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News