सत्तांध राज्यकर्ते आणि असुरक्षित प्राणी


सत्तांध राज्यकर्ते आणि असुरक्षित प्राणी

आपल्या मालकीच्या गायीचे वासरू वाघाने मारले म्हणून त्यावर विष टाकून वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा बळी घेण्याचा खळबळजनक प्रकार राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात घडला आहे. यावर देशातील वा राज्यातील एकाही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षनेत्यांची संवेदना प्रकट झाली नाही.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

अंगावर काटे उभे रहावे, मनाचा थरकाप उडावा, हृदयाचे ठोके बंद पडावे अशा प्रकारची घटना नुकतीच नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कर्‍हांडच्या अभयारण्यात कर्‍हांडला बिटात घडली आहे. आपल्या मालकीच्या गाईचे वासरू एका वाघीणीने मारले. आपल्या तिन बछड्यांना खावू घालण्यासाठी निसर्ग नियमानुसार तीने गाईच्या वासराचा फडशा पाडला. परंतू गाईच्या मालकाने बदला घेण्याच्या भूमिकेतून या मेलेल्या वासरूवर विष टाकले. आणि तिन बछड्यांसह वाघीणीला संपविले. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने प्राणीप्रेमी जगतात संताप व्यक्त होतो आहे. सत्तांध राज्यकर्त्यांमध्ये यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. जाती-पातीच्या झेंड्याखाली बसलेल्या तथाकथित जातीयवादी नेत्यांनी सुध्दा या घटनेची दखल घेतली नाही. महापुरूष वाटले गेले, रंगांची वाटणी झाली तशी प्राण्याची, पशुपक्षांचीही जात-निहाय वाटणी झालेली असती तर कदाचित त्या-त्या जातीच्या लोकांनी आपल्या प्राण्यांवर, पक्षांवर झालेल्या अन्याया-अत्याचाराबाबत मेणबत्या तरी पेटवल्या असत्या. कारण अलिकडच्या काळात आमची मानसिक गुलामगिरी इतकी खालच्या पातळीवर गेली आहे की अत्याचारित बालिका तरूणी, महिलेची जात कळाल्याशिवाय प्रतिक्रिया देखील येत नाही. मग प्राणीमात्रांची काय बिशात. परंतू अलिकडच्या काळात मांडूळ सापापासून तर वाघांपर्यंतच्या शिकारी होण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. कासव, काळीमांजर, घुबड, मांडूळ साप यांचा उपयोग काळी जादू म्हणून केला जात असल्याने त्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते आहे. कालच पुणे शहरात 20 लाखांचे मांडूळ साप जप्त्ा करण्यात आले असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. धुळ्यासारख्या शहरात आजही सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान शेकडो लाहोरी-तितर पक्षी विकले जातात. तसेच याच आठवड्यात धुळे शहरात मांडूळ तस्करी करणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे यात असलेली मंडळी ही सुशिक्षित असते. वाघाची कातडी, दात, नखे, हरणाची कातडी, शिंगे, हत्तीचे दात, काळविटाची शिंगे, यांचा व्यापार करणार्‍या टोळ्या आजही राज्यात कार्यरत आहेत. घोरपड, पाणकोंबडी, जंगली कबुतर, ससे, लाहुरी, तितर, यांचे मांस सर्रास खाल्ले जाते. बेडकांची तस्करी केली जाते. मोरांची पिसे मिळविण्यासाठी त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते आहे. त्यापेक्षाही कु्ररता म्हणजे मोराचे मांस देखील आता खायला लागले आहेत. मासे, कोंबड्या, बकर्‍यांचे मांस खाणारी मंडळी आता रेड्याचे मांस कुठे मिळेल ? याचा शोध घेतांना दिसतात. या देशात पशु, पक्षी, प्राणी यांच्या समस्या, त्यांची सुरक्षितता, त्यांचे भोजन, त्यांचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था, त्यांचेसाठी भुखंडाची, अभयारण्याची व्यवस्था यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्याची आवश्यकता आहे. केवळ संशोधन नव्हे तर प्राधान्य क्रमाने त्यावर अंमलबजावणी देखील झाली पाहिजे. वन्यजीव प्राणीसंस्थांचे अनेक अहवाल शासन दरबारी धुळखात पडून आहेत. कारण मानवाच्या दैनंदिन समस्या इतक्या मोठ्या आहेत की, प्राण्यांच्या घटणार्‍या संख्येवर, त्यांच्या मृत्यूवर, पशुपक्ष्यांच्या संवर्धनावर लक्ष्य देण्यासाठी राज्यकर्त्यांजवळ वेळ नाही. परंतू राज्याचे मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष्य घालावे अशी आमची विनंती आहे. महानगरांच्या विस्तारात आणि महामार्गांच्या हव्यासापोटी आम्ही घनदाट जंगले संपविली. जी आहेत त्यात देखील राजकारण सुरू आहे. या देशात आणि राज्यात विपूल प्रमाणात असलेली वनसंपदा अतिशय बेदरकारपणाने संपविली जाते आहे. त्यामुळे जवळपास दहा हजार पशु पक्षी-प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात 2019 मध्ये लागलेल्या आगीमुळे त्या जंगलातील किमान एक अरब प्राणी मृत्यूमुखी पडल्याने त्या देशातील प्रधानमंत्र्यांच्या विरोधात जनतेने रस्त्यावर येवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आमच्या प्रत्येक कार्यक्रमात येणार्‍या पिढीला चिमणी कशी असते याचे चित्र आम्हाला कागदावर काढून दाखवावे लागेल अशी खंत व्यक्त करीत होते. घराच्या छतांमध्ये गवताचे घर करून राहणार्‍या चिमण्या मोठ मोठ्या टॉवर संस्कृतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात वाघांची संख्या केवळ 225 आहे. देशातील 18 राज्यात 2006 पासून व्याघ्र गणना घेण्यात येते. रेष विभाग पद्धतीनूसार घेण्यात आलेल्या या व्याघ्र गणनेत देशात 1 हजार 411 वाघ आढळून आले आहेत. ही संख्या गेल्या दहा वर्षात 2 हजार पाचशे पर्यन्त पोहचली असल्याची माहिती वन्य विभागाने दिली आहे. परंतू ही वाढलेली संख्या केवळ कर्नाटक, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांची आहे. महाराष्ट्रात ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जवळपास 90 वाघ आहेत. असे असले तरी वाघांची होणारी शिकार आणि तस्करी, आजारपणामुळे व आपसातील भांडणामुळे मृत्यू पावणार्‍या वाघांची संख्या ही चिंताजनक आहे. वने, जंगले, अभयारण्ये संपविण्याचे पाप मानवी प्रगतीच्या नावाखाली सुरू असतांना शहरात घुसणार्‍या बिबट्यांची, वाघांची संख्या वाढतांना दिसते आहे. परंतू मनोरंजन म्हणून आम्ही त्या घटनांकडे बघतो ही आमची ‘बौद्धिक दिवाळखोरी’ आहे. जंगलातले बिबटे, वाघ, रानगवा, हरिण शहरात फिरायला येत नाही, तर पाण्याच्या, अन्नाच्या शोधात येतात याकडे सरकारचे, वन विभागाचे लक्ष्य नाही. केवळ 14 जानेवारीच्या मकर संक्रांती निमित्त होणार्‍या पतंगबाजीत हजारो पक्षी मांजाने कापले जावून मरतात ही शोकांतिका आहे. 2016 मध्ये उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘जय’या वाघाचा अद्यापही तपास लागलेला नाही. जयचा बच्छडा ‘जयचन्द’ अद्यापही सापडलेला नाही. भारतीय वन्य जीव संस्था व अभयारण्य प्रशासनाने ज्या पद्धतीने काम केले पाहिजे तसे होतांना दिसत नाही. या क्षेत्रातील अधिकारी राजकारणी मंडळी, नातेवाईक, मोठ्या सेलेब्रिटींना अनधिकृतपणे अभयारण्याच्या सफारी घडविण्यात धन्यता मानतात. देशभरात एकूण 50 आणि महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. परंतू त्यांच्या अनेक समस्या राज्यकर्त्यांच्या लालफिताशाहीत बंद आहेत. वाघांच्या मृत्यू बाबत अद्यापही कडक कायदे या देशात नाहीत. काळविटांचे मांस खाणारा सलमान खान आणि त्यांचे सोबती अद्यापही मोकाट आहेत. ही या देशाची व्यवस्था आहे. तिन बछड्यांसह वाघीणीचा मृत्यू ही मन हेलावणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडलेली आहे. राज्यकर्त्यांच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. मतांचा आणि जातीच्या गलीच्छ राजकारणात चार वाघांचे मृत्यू ही चितांजनक घटना आहे. यावर चिंतन व्हावे. एव्हढेच.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News