माळरानावर फुलवली अंजिर फळ शेती!! निंबुतच्या शेतक-याची यशोगाथा


माळरानावर फुलवली अंजिर फळ शेती!! निंबुतच्या शेतक-याची यशोगाथा

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

    बारामती तालुक्यातील निंबुत हे जवळपास पाच  हजार लोकसंख्येचे गाव. या भागातील बहुतांश जमीन ही जिरायती प्रकारची आहे. या गावातील शेतकरी दिपक विनायक जगताप यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांच्या वडिलोपार्जीत सहा एकर पडीक माळरानावर अक्षरश: अंजिराची बाग फुलविली आहे. त्यांच्या या यशाला खरोखरच सलाम. 

प्रथम त्यांनी माळरानावरील चढउतार, खडकाळ जमीन, छोटे-मोटे दगड गोटे दूर करुन त्यांनी माळरानाचे सपाटीकरण केले. त्यासाठी त्यांना पाच लाख  रुपये खर्च आला. रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना दोन हेक्टर साठी पस्तीस हजार अनुदान भेटले होते. वीर धरणातील कालव्याजवळ असणा-या विहीरीतून दोन  कि.मी. अंतरावरुन माळरानावर पाणी आणले. त्यात त्यांनी भाजीपाला, ऊस इत्यादी पीके घेण्यास सुरवात केली. परंतू त्या पीकामध्ये बाजारभावाची उणीव, चढउतार असल्याने त्यांना इतर पीकात उतरावे असे वाटले. नंतर त्यांनी फळबाग क्षेत्राची निवड केली. यामध्ये त्यांनी डाळींब, संत्रा व अंजिर या फळपीकाची लागवड घेण्यास सुरुवात केली. संत्रा फळाला हवामान मानवले नाही. डांळिबाचे उत्पन्न चांगले आले, मात्र तेलकट डाग व मर रोग यामुळे डाळींब पिकासही म्हणावे असे यश आले नाही. अंजिर मात्र किफायतशीर ठरले. मग मात्र त्यांनी अंजिर हेच पीक घेण्याचा मनापासून निर्धार केला. त्यांचे बंधु गणेश जगताप यांनी पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून अंजिर शेती करावयाची हा निर्धार केला. दिवस-रात्र एक करुन त्यांनी सर्व कुटुंबासहीत अंजिर पीकाची मन लावून जोपासना करण्यास सुरवात केली.

लागवड, बहर आणि उत्पादन -प्रथम टप्प्या  टप्याने दोनशे, तीनशे, चारशे आणि 2018 साली अखेर त्यांनी सहा ए़करामध्ये एकुण नऊशे अंजीर झाडाची लागवड केली. अंजिर पीकाचे खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. खट्टा बहर- जून मध्ये छाटणी  करुन साधारण साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. प्रती झाडापासून ऐंशी  ते शंभर किलो  उत्पन्न मिळते. एकरी उत्पादन अठरा  ते  वीस टन भेटते. या बहरास प्रती किलोचा दर 40 ते 70 रुपये येतो. मिठा बहर - छाटणी कालावधी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात असतो. याचीही साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. या बहाराच्या फळांस प्रती किलो 90 रुपयांपर्यंत दर मिळतो.

दिपक जगताप यांनी अंजिर बागेस रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रीय खतांचा जास्तीस जास्त वापर केला. त्यामुळे त्यांच्या मालाला चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळाला. जिवामृत, घण जिवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र अशा प्रकारचे जिवामृत त्यांनी अंजिर झाडास वापरले. जगताप कुटुंब जिवामृत हे स्वत: शेतातच बनवतात. जगताप यांनी अंजिराच्या चांगल्या उत्पादनासाठी इतरांपेक्षा बहार धरण्याचे महिने बदलले, पाचटांचा वापर करुन जिवाणूंची संख्या वाढवली, झाडांच्या भोवती पाचटांचे अच्छादन करुन कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्याकडे भर दिला, यांत्रिकीकरणावर जास्त भर दिला, तोडलेला माल डोक्यावरुन वाहून नेण्यापेक्षा छोटया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने किंवा बुलेटच्या ट्रॉलीने  बागेतून बाहेर काढणे आणि फवारणीसाठी आधुनिक यंत्रणा वापरण्याकडे भर दिला. मागच्या वर्षी व यंदा अतिवृष्टिमुळे अंजिराचे आगार असणाऱ्या शेजारील पुरंदर तालुक्यातील अनेक बागांचे नुकसान झाले. करपा आणि तांबेरा या प्रमुख रोगामुळे अनेक अंजिर बागा उद्ध्वस्त झाल्या. मात्र, जगताप यांच्या बागेचे योग्य व्यवस्थापन असल्याने करपा आणि तांबेरा रोग त्यांच्या बागेकडे फिरकलाच नाही. तसेच पाण्याचा निचरा योग्य केल्यामुळे अतिवृष्टिमुळेही काही नुकसान झाले नाही. 

जगताप  यांच्या स्वभावातच शेतकरी संशोधकाची वृत्ती दिसून येते. स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृध्दीकडे, ज्ञानातून अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परीवर्तन घडवणे हा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. अपार कष्ट, जिद्द आणि संशोधन वृत्ती अंगी असेल तर शेतकरी काय करु शकत नाही ? याचा ज्वलंत धडा श्री. जगताप यांनी इतर शेतकऱ्यांना  दिला आहे. अंजिराच्या उत्पादनापासून त्यांना वर्षाला खर्च वजा करुन निव्वळ नफा सहा लाखापर्यंत भेटतो. कोल्हापूर, सांगली, निरा, पुणे आणि कल्याण या ठिकाणी फळाची विक्री होते. महाराष्ट्रातील जालना, नाशिक, सोलापूर, सांगली, इंदापूर, पंढरपूर, जुन्नर आणि जळगाव  इत्यादी  ठिकाणचे शेतकरी जगताप यांची अंजिर बाग पाहवयास येतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. कोरोना विषाणूच्या संसर्गामधील लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या,  बरेच जण बेरोजगार झाले. मात्र, त्यावेळी श्री. जगताप यांनी मार्च ते मे या तीन महिन्यात पावनेतीन लाखाचा माल विकला. यासाठी त्यांना कृषि खात्याने वाहतुकीची परवानगी दिली होती. त्यांच्या  अंजिर बागेत बारा ते पंधरा लोकांना रोजगार भेटला आहे. ही पण एक जमेची बाजू आहे. जगताप यांना अंजिर पिकाने आर्थिक सक्षमता दिली. या पिकामध्ये आठ ते दहा वर्ष कार्यरत असल्यामुळे वेगवेगळया किडीरोग, वातावरणाचा अनुभव आला व तोच अनुभव ते  शेकडो शेतकऱ्यांना देत आहेत. त्यांची अंजिर बाग पाहण्यासाठी अनेक कृषि क्षेत्रातील मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढत आहे याच शंकाच नाही.

अंजिर बागेचा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यापाठीमागे किटकशास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालय, कोल्हापूर डॉ. विकास खैरे, किड व रोग तज्ञ रघुनाथ चौसष्टे, उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती  बालाजी ताटे, तालुका कृषि अधिकारी बारामती दत्तात्रय पडवळ यांचे श्री. जगताप यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

श्री. जगताप यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने सन 2018 साली त्यांना अंजिररत्न पुरस्काराने व सन 2019 मध्ये शेती प्रगती कृषि भूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच जगताप यांचा अंजिर शेतीचा अभ्यास व संशोधनाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादक संशोधक संघाच्या संचालक पदी त्यांची निवड केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News