भगवान दत्तात्रयांच्या नावाचा जयघोष.. करत देवगड येथे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा, कोरोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या सारे विश्व सुखी होऊ द्या-महंत भास्करगिरी महाराज यांचे भगवान दत्तात्रयांना साकडे


भगवान दत्तात्रयांच्या नावाचा जयघोष.. करत देवगड येथे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा,  कोरोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या सारे विश्व सुखी होऊ द्या-महंत भास्करगिरी महाराज यांचे भगवान दत्तात्रयांना साकडे

अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी पाळण्याची दोरी ओढतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज समवेत महंत सुनीलगिरी महाराज व ब्रम्ह वृंद मंडळी दिसत आहे(छायाचित्र-सुधीर चव्हाण नेवासा)

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) भू-लोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे मंगळवारी दि.२९ डिसेंबर रोजी दत्तजयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...दत्तात्रय भगवान की जय" असा दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी ६ वाजता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.कोरोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या,सारे विश्व सुखी होऊ द्या असे साकडे दत्त जन्म प्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना घातले.

यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने श्री क्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.मंगळवारी सायंकाळी ६ वाजता श्री दत्त मंदिरात छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी पहाटे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊन अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर भास्करगिरी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात येऊन आरती करण्यात आली.

यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी महंत सुनीलगिरी महाराज,महंत योगी ऋषीनाथ महाराज, गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मातोश्री श्रीमती सरूबाई पाटील,खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे,माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे,सौ.धनश्री विखे,बदनापूरचे आमदार नारायण कुचे,आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी सरपंच अजय साबळे,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील,मारुतीराव साबळे,दिनकरराव कदम यांच्यासह संत महंत उपस्थित होते.

यंदा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा झालेल्या श्री दत्त जन्मोत्सव प्रसंगी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला देवगडला न येता घरीच दत्त उपासना करावी अशी विनंती प्रार्थना केल्यानंतर सर्व भक्तांनी त्याचे पालन केले त्याबद्दल त्यांनी सर्व भक्तांचे आभार मानले.

दत्त महिमा व येथील जन्मोत्सवाचे महत्व सांगतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की गेल्या साठ वर्षांपूर्वी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी हा महोत्सव सुरू केला त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण स्वर्ग सुखाचा आनंद उपभोगत आहे.कोरोना मुळे येथे सर्वांनी नियम पाळले बाधा येऊ दिली नाही गर्दीचा फायदा रोगाला नको म्हणून सुजाण माणसांनी गर्दी टाळली असेच नियम सर्वांनी पाळले तर देशाचे वैभव वाढण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणीही असू नये अशी प्रार्थना त्यांनी यावेळी बोलताना केली.


दरम्यान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त मंगळवारी दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दिगंबरा... दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ ...दिगंबरा.. चा जयघोष करत मंदिर प्रांगणात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या.यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर मंदिर प्रांगणात प्रदक्षिणास प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी भक्तिगीते गाणारे बँड पथक, सनई चौघडा वादक,त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत मोजकेच झेंडेकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

श्री दत्तजयंती निमित्ताने यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शासन नियमांचे पालन म्हणून गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दत्तजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.तसेच यात्रा रद्द चा निर्णय याआधीच झाल्याने आज पहाटे पासून देवगडकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते.त्यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा,नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे,नेवासा पोलीस स्टेशनचे आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते,विनय ठाकूर,पीएसआय प्रदीप शेवाळे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दुपारी १२ वाजता दत्तजयंती निमित्ताने सात दिवस चाललेल्या दत्त यागाची गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून होम कुंडात श्रीफळ अर्पण करण्यात येऊन पूर्णाहुती देण्यात येऊन सांगता करण्यात आली.झालेल्या दत्त योगाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य शरदगुरू काटकर,गणेशदेवा कुलकर्णी यांचेसह ब्रम्हवृंद मंडळींनी केले.दत्तजन्म झाल्यानंतर उपस्थित मोजक्याच भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला.

यावर्षी साध्या पद्धतीने दत्तजयंती सोहळा साजरा झाला या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण मंदिराच्या मुख्य सभामंडपात दहा भाविकांच्या उपस्थितीत पार पडले तर रात्रीच्या वेळी झालेली कीर्तने ही यावेळी तीस ते पस्तीस भाविकांच्या उपस्थितीत पार पडली या वर्षी सप्ताहामध्ये होणारे इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News